मुंबई - 'एका बाजूला कच्या कैद्यांना सोडले जाते. तर दुसऱ्या बाजूला जे गंभीर स्वरुपाचे आरोपी नाहीत अशांना एनआयए समोर हजर होऊन अटक करायला सांगितली जाते. ही सर्वोच्च न्यायालयाची दुटप्पी भूमिका असून सूडबुद्धीने पार पाडलेली प्रक्रिया आहे' अशी प्रतिक्रिया अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. आज आनंद तेलतुंबडे यांना कोर्टाने 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया दिली.
आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया... हेही वाचा...'फुले-आंबेडकर जयंतीचा निधी हातावर पोट असणाऱ्या समुहाला द्या'
भीमा कोरगाव येथे दोन वर्षांपूर्वी दंगल झाली होती. या दंगलीला कारणीभूत एल्गार परिषद असल्याचा आरोप झाला होता. या परिषदेच्या आयोजकांची एनआयएकडून चौकशी सुरू असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल्गार परिषदेमधील एक आयोजक प्रख्यात विचारवंत आनंद तेलतुंबडे यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळल्यावर तेलतुंबडे यांनी एनआयए कडे आत्मसमर्पण केले. त्यांना आज उच्च न्यायालयात हजर केले असता त्यांना 18 एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.
आनंद तेलतुंबडे यांना अटक... तेलतुंबडे यांना पोलीस कोठडी दिल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना देशभरात लॉकडाऊन असताना कच्या कैद्यांना सोडले जात आहे. तर दुसरीकडे आनंद तेलतुंबडे यांना अटक केली जाते. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तेलतुंबडे यांना 18 तारखेला पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यावेळी पुढे काय होते ते बघू, असेही आंबेडकर म्हणाले. यावेळी रमाताई तेलतुंबडे, आनंदराज आंबेडकर, आमदार कपिल पाटील आदी उपस्थित होते.