मुंबई - 'आरे' संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत, यापुढे कोणतेही झाड तोडू नये, असे महाराष्ट्र सरकारला सांगितले आहे. त्यानंतर, पर्यावरणप्रेमींमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे जनतेच्या संघर्षाला मिळालेले यश असल्याचे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे जनतेच्या संघर्षाला मिळालेले यश... तर, 'आरे'तील वृक्षतोडीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. हा एकप्रकारे पर्यावरणप्रेमी व मुंबईकरांचा नैतिक विजय असल्याची प्रतिक्रिया, शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच, आरेमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष, प्राणी, जैवविविधता असताना अद्याप 'आरे'ला सरकारने जंगल घोषित केले नाही. ही सरकारची चूक असल्याची टीका मनीषा कायंदे यांनी केली आहे. हा एकप्रकारे पर्यावरणप्रेमी व मुंबईकरांचा नैतिक विजय... सर्वोच्च न्यायालयाने 'आरे' प्रकरणी आज निकाल देत, या प्रकरणात अटक केलेल्या आंदोलकांना तातडीने सोडण्यात यावे, असे सांगितले. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी, ज्यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही, त्यांना लवकरच सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच, यापुढे आरेमधील कोणतेही झाड तोडण्यात येणार नसल्याचे आश्वासन देत, सर्वोच्च न्यायालयाने 'आरे' परिसरातील सुरक्षा स्थिती कायम ठेवण्यास सांगितले आहे. यापुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होईल.