मुंबई - मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलिया स्फोटके प्रकरण ( Antilia Explosive Case ) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण ( Mansukh Hiren murder case ) यामध्ये माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA अटक केली होती. जुलै महिन्यात प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. प्रदीप शर्मा यांनी एनआयए विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज मंगळवार (दि. 14) रोजी सुनावणी झाली मात्र प्रदीप शर्मा यांना न्यायालयाने कुठलाही दिलासा दिला नाही.
21 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी -
अँटिलिया स्फोटके प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने NIA अटक केली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करणे आणि या कटात सहभागी असल्याचा आरोप लावत त्यांना एनआयएने अटक केली होती. प्रदीप शर्मा यांना येण्याने अटक करून 6 महिने झाले आहे. सध्या प्रदीप शर्मा न्यायालयीन कोठडीत आहे. जामीन देण्यात यावा याकरीता प्रदीप शर्मा यांच्याकडून मुंबई NIA विशेष न्यायालयात अर्ज केला होता मात्र न्यायालयाने आज प्रदीप शर्मा यांना कुठलाही दिलासा दिला नसून पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे.
प्रदीप शर्मा यांच्यावरील आरोप -
मुंबई पोलीस खात्यात 117 हून अधिक एन्काऊंटर करणाऱ्या माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेली आहे. संतोष शेलार या व्यक्तीची राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशी केल्यानंतर प्रदीप शर्माचा या प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होतो. प्रदीप शर्मा यांच्या घरातून राष्ट्रीय तपास यंत्रणेला परवाना संपलेले पिस्तूल व काही जीवंत काडतुसे आढळून आली होती. मनसुख याची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यामध्ये प्रदीप शर्मा याचा सर्वात मोठा सहभाग असल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला होता. सचिन वाझे व प्रदीप शर्मा या दोघांनी आनंद जाधव, संतोष शेलार यांच्यासह बऱ्याच वेळा मिटींग केल्याचाही राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.