मुंबई -बोरिवली (पश्चिम) येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदीर संकुलात सुमारे दहा महिन्यांच्या कालावधीनंतर पहिला नाट्यप्रयोग उद्या रविवार दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी दुपारच्या सत्रात सादर होणार आहे. प्रयोग सादरीकरणासाठी हे नाट्यगृह कोविड १९ प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सुसज्ज झाले आहे.
'मिशन बिगीन अगेन'
कोविड १९ या संसर्गजन्य महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीचा भाग म्हणून मार्च २०२०पासून बंद ठेवण्यात आलेली नाट्यगृहे आता खुली करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार, मिशन बिगीन अगेन अंतर्गत अटी व शर्तींनुसार ही नाट्यगृहे सुरू होत आहेत.
५० टक्के आसन क्षमता
बोरिवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिर संकुलातील मुख्य व लघु नाट्यगृहांची सुविधादेखील या अटी व शर्तींसापेक्ष तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीन्वये सुरू करण्यात येत आहे. या नाट्य संकुलाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले असून सर्व तांत्रिक उपकरणांची तपासणी करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार आसनक्षमता ५० टक्के राखण्यात आली आहे. प्रयोग सादरीकरणासाठी नाट्यगृह सुसज्ज आहे. येणाऱया नाट्य रसिकांचे, अभ्यागतांचे शारीरिक तापमान मोजण्यासाठी नाट्य संकुलाच्या प्रवेशद्वारांवर थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे.
नाट्य रसिकांसाठी पर्वणी
बृहन्मुंबई महानगरपालिकेची नाट्यगृहे सवलतीच्या दरात नाट्य प्रयोगांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी नुकतेच जाहीर केले आहे. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिर संकुलातही सवलतीच्या दरात आरक्षण करून २० डिसेंबर रोजी दुपार सत्रात पहिला प्रयोग सादर करण्यात येणार आहे. मार्च २०२० पासून बंद असलेली नाट्यगृहाची सुविधा जवळपास दहा महिन्यांनंतर सुरू होत आहे. नाट्य रसिकांसाठी ही पर्वणी असणार आहे. नाट्यक्षेत्रातील सर्व संबंधित तसेच सर्व रसिकांनी देखील कोविड १९ प्रतिबंधात्मक सूचना, निर्देश, उपाययोजना यांचे पालन करावे, असेदेखील आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.