मुंबई- क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी तसेच आर्यन खान अटक प्रकरणात पंच असलेले प्रभाकर साईल यांना एनसीबीने समन्स बजावलं आहे.त्यांनी आर्यन खान अटक प्रकरणात एनसीबीचे अधिकारी पैसे उकळणार होते, असा गंभीर आरोप केलाला आहे. याच आरोपानंतर चौकशीसाठी हे समन्स पाठवण्यात आले आहे. आज (बुधवार) 27 ऑक्टोबर रोजी साईल यांना एनसीबीसमोर हजर राहिला सांगितले आहे.
एनसीबी पथकाकडून होणार चौकशी
साईल यांनी केलेल्या आरोपांची दखल घेत एनसीबीने चौकशी पथक नेमलेलं आहे. पाच अधिकाऱ्यांचं हे पथक दिल्लीहून मुंबईला येत आहे. याच पथकाकडून साईल यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच यावेळी हे अधिकारी साईल यांचीदेखील चौकशी करणार आहेत. याच कारणामुळे साईल यांना समन्स पाठवण्यात आले आहे. समन्सनुसार आज 27 ऑक्टोबर रोजी प्रभाकर साईल यांना चौकशीसाठी पथकासमोर उपस्थित राहावं लागणार आहे.
कोण आहेत प्रभाकर साईल?
प्रभाकर राघोजी साईल (वय 40) हे अंधेरी पूर्वेला येथे राहतात. ते केपी अर्थात किरण प्रकाश गोसावी यांचे बॉडीगार्ड आहेत. 22 जुलै 2021 पासून गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून तो काम करत आहे. 30 जुलै 2021 रोजी तो गोसावीच्या ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये पहिल्यांदाच गेला होते. त्यावेळी इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याचं गोसावीने त्यांना सांगितलं होतं. त्यानंतर गोसावीने साईलला बॉडीगॉर्ड म्हणून नेमलं होतं.
साईल यांचे आरोप काय?
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा साईल यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.
गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगा दिल्या
तसेच एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईल यांनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.