महिलांसाठी खुशखबर.. एका रुपयांत मुंबईतील 'या' स्थानकात मिळणार पावडर रूमची सुविधा
मुंबईतील मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील घाटकोपर मेट्रो स्थानकांत महिला प्रवाशांसाठी उद्यापासून 'पावडर रूम लाऊंजची विशेष सुविधा सुरु होणार आहे. सुरुवातीला एक महिना ही 'पावडर रूम लाऊंजची सुविधा निशुल्क असणार आहे. त्यानंतर या सुविधेसाठी दिवसाला एक रुपयांप्रमाणे वर्षाला ३६५ रुपये द्यावे लागणार आहेत.
मुंबई -मुंबईतील मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील घाटकोपर मेट्रो स्थानकांत महिला प्रवाशांसाठी उद्यापासून 'पावडर रूम लाऊंजची विशेष सुविधा सुरु होणार आहे. सुरुवातीला एक महिना ही 'पावडर रूम लाऊंजची सुविधा निशुल्क असणार आहे. त्यानंतर या सुविधेसाठी दिवसाला एक रुपयांप्रमाणे वर्षाला ३६५ रुपये द्यावे लागणार आहेत.
काय आहे 'पावडर रूम लाऊंज ?
मुंबईतील मेट्रो प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. विशेष म्हणजे, मेट्रोच्या एकूण प्रवासी संख्येपैकी ४१ टक्के महिला प्रवाशांची संख्या आहे. त्यामुळे महिलांचा प्रवास सुखर आणि आनंददायी होण्यासाठी महिला प्रवाशांसाठी मेट्रोकडून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता तर विमानतळाच्या धर्तीवर मेट्रोने वनच्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मेट्रो स्थानकांत महिला प्रवाशांसाठी 'पावडर रूम लाऊंजची विशेष सुविधा सुरु करण्यात आली आहे. घाटकोपर मेट्रो स्थानकातील पावडर रूम हे महिलांसाठीचे पहिले विशेष असे लाऊंज असून त्याद्वारे महिलांना स्मार्ट आरोग्यपूर्ण, स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे उपलब्ध झाली आहेत. त्याशिवाय येथे सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्सर, कॅफे आणि महिलांच्या विविध स्वच्छता व वेलनेस उत्पादनांचे रिटेल आउटलेट उपलब्ध आहे.
असे असणार पावडर रूम लाऊंज -
घाटकोपर मेट्रो स्थानकांत महिला प्रवाशांसाठी सुरु करण्यात आलेल्या 'पावडर रूम लाऊंजचे अनेक वैशिट्य आहेत. तब्बल एक हजार चौरस फुटांवर विस्तारलेले मुंबईतील पहिले विशेष पावडर रूम लाऊंज आहे. घाटकोपर मेट्रो स्थानकांचा पोटमाळ्यावर हे विशेष लाऊंज असणार आहे. विविध वयाच्या आणि समाज घटकातील महिलांसाठी पावडर रूम लाऊंजचा उपयोग करता येणार आहे.
या मिळणार सुविधा -
घाटकोपर मेट्रो स्थानकांतील पावडर रूम लाऊंजमध्ये महिला प्रवाशांना वाय-फाय, वातानुकुलित यंत्रणा, 8 स्मार्ट स्वच्छ, आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित अशी टॉयलेट,सॅनिटरी पॅडचा डिस्पेन्सरची सुविधा असणार आहे. याशिवाय लहान मुलांचे डायपर बदलण्याची सोय आणि 14 आसनांचा एक कॅफे असणार आहे.
असे असणार दर-
ज्या महिला प्रवाशांना पावडर रूम लाऊंजचा वापर करायचा आहे. त्यांना एक खासगी अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर सुरुवातीच्या एका महिन्यासाठी लाँऊज विनाशुल्क असणार आहे. मोफत कालावधी संपल्यानंतर, महिला प्रवाशांना एका वर्षासाठी सेवेची सदस्यता घ्यावी लागणार आहे. दिवसाला एक रुपयांप्रमाणे वर्षाला ३६५ रुपये द्यावे लागतील. ही प्रीमियम सुविधा सर्व महिला प्रवाशांसाठी उद्यापासून घाटकोपर मेट्रो स्टेशनवर सकाळी 7 ते रात्री 09.30 या वेळेत उपलब्ध करून दिली जाईल. सध्या सर्व स्थानकांवर उपलब्ध असलेल्या वॉशरूम सुविधे व्यतिरिक्त ही सुविधा देण्यात आली आहे.