मुंबई- मुंबईत दरवर्षीं पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेकडून कोल्ड मिक्सचा वापर केला जातो. कोल्ड मिक्समुळे खड्डे योग्य प्रकारे बुजवले जात नाहीत असा आरोप आणि टीका केली जात असताना यंदा पुन्हा खड्डे कोल्डमिक्सने भरले जाणार आहेत. ३ हजार मेट्रिक टन कोल्ड मिक्स तयार केले जाणार असून आतापर्यंत २४ वॉर्डात १ हजार ३२५ मेट्रिक टन कोल्ड मिक्सचे ( Cold Mix ) वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
कोल्ड मिक्सचा वापर -पावसाळापूर्व नालेसफाई, रस्ते बांधणी, पुलांची दुरुस्ती अशी विविध कामे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत. काही दिवसांनंतर मुंबईत मान्सूनचे आगमण होईल. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली असून बहुतांशी कामे पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण अधिक असल्याने खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्सचा वापर यंदाही केला जाणार आहे. मुंबईतील रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने २०१७ पासून कोल्डमिक्सचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला पालिकेने ऑस्ट्रियातून महागडे कोल्डमिक्स तंत्रज्ञान साहित्य मागविले होते. मात्र, या कोल्डमिक्सचा पाहिजे तितका परिणाम दिसून आला नाही. शिवाय ते महागडेही असल्याने पालिकेने स्वतः कोल्डमिक्स उत्पादन तयार करण्याचा निर्णय घेतला. कोल्ड मिक्स जे बाहेरून आयात करण्यात येत होते. त्याची किंमत प्रति किलो १७० रुपये असल्याने ते महागात पडत होते. त्यामुळे पालिकेने वरळी येथील डांबर प्लांटमध्ये कोल्डमिक्सचे उत्पादन केल्याने ते पालिकेला प्रति किलो स्वस्त दरात उपलब्ध होते आहे. पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात व पावसानंतर रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी कोल्ड मिक्सचा वापर करण्यात येतो आहे. मात्र, अनेकवेळा कोल्डमिक्स पहिल्याच पावसांत वाहून जात असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सभागृहात कोल्डमिक्सवर प्रश्नितचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.