मुंबई -राज्यातल्या शाळांमधील शिपाई आणि इतर चतुर्थश्रेणींची पदे रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाचा जीआर शुक्रवारी राज्य सरकारकडून काढण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात संस्थाचालक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शाळांमधील शिपाई आणि इतर चतुर्थश्रेणींची पदेच काढून ती कंत्राटदारांच्या घशात घालायची असतील तर सरकारने आता शाळा आणि राज्यातील शिक्षणच बंद करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शाळांतील शिपाई, नाईक, पहारेकरी, सफाई कर्मचारी, हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर आदी चतुर्थश्रेणी पदांसाठी अत्यंत घातक आणि राज्यातील शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केवळ भांडवलदार बनून राज्यातील अनेक कार्यालयांमध्ये धुडगूस घातलेल्या कंत्राटदारांचे भले होणार आहे. अशी प्रतिक्रीया शिक्षक आमदार नागो गाणार यांनी दिली आहे.
चतुर्थश्रेणी संघटनांकडून आंदोलनाचा इशारा
कंत्राटदारांकडून भरण्यात येणाऱ्या या पदांमुळे शाळांचे अस्तित्व धोक्यात येणार असून, शिक्षणाप्रतीची विश्वार्हतता आणि बांधीलकीही संपुष्टात येणार आहे. शिवाय पदे कायमची रद्द करून सरकार गोरगरीबांच्या मुळावर उठले आहे काय असा सवाल सत्यशोधक चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे परमेश्वर कसबे यांनी उपस्थित केला आहे. तसेच हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा याविरोधात आंदोलन छेडू असा इशारा विविध चतुर्थश्रेणी संघटनांनी दिला आहे.