मुंबई - कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना विशेष करून श्वसनाचा आजार होतो. कोरोनामधून मुक्त झाल्यावरही अनेकांना धाप लागणे, श्वसनाला त्रास होणे यासारख्या व इतर समस्या जाणवत आहेत. अशा रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून मुंबई महापालिकेने नायर, सायन, सेव्हन हिल्स या रुग्णालयात 'पोस्ट कोरोना ओपीडी' सुरू केली आहे. लवकरच जम्बो सेंटरमध्येही ही ओपीडी सुरू केली जाणार आहे.
केईएम, नायर, सायन, सेव्हन हिल्स रुग्णालयात ‘पोस्ट कोरोना ओपीडी’ सुरू - corona patient in mumbai
गेल्या पाच महिन्यात मुंबईत कोरोनाचे 1 लाख 37 हजार रुग्ण आढळून आले असून 7 हजार 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 11 हजार 967 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रसार होऊ लागला. गेल्या पाच महिन्यात मुंबईत कोरोनाचे 1 लाख 37 हजार रुग्ण आढळून आले असून 7 हजार 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 11 हजार 967 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रतिबंधक उपाययोजना आणि सर्वोत्तम औषधोपचार यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के इतके आहे.
डिस्चार्ज देण्यात आल्या नंतरही अनेक रुग्णांना अनेक शारीरिक समस्या पाहायला मिळाल्या. त्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यांदा केईएम रुग्णालयामध्ये पोस्ट कोरोना ओपीडी सुरू करण्यात आली. त्यानंतर आता नायर, सायन, सेव्हन हिल्स येथे पोस्ट कोरोना ओपीडी सुरू करण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबई महापालिकेच्यावतीने हजार किंवा त्यापेक्षा जास्त बेड उपलब्ध असलेल्या जम्बो कोरोना केंद्रांमध्ये आता पोस्ट कोरोना ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. यात बीकेसी कोरोना सेंटर, मुलुंड, दहिसर आणि महालक्ष्मी येथील कोरोना सेंटर्सचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.