महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता, वातावरण ढगाळ राहणार - मुंबई पाऊस अपडेट

रात्रीपासून पावसाने मुंबईत पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबईत रात्रभर पाऊस पडत असून गेल्या 24 तासांत कुलाबा येथे 63.2 मिलिमीटर तर सांताक्रूझ येथे 31.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई पाऊस
मुंबई पाऊस

By

Published : Aug 21, 2020, 10:14 AM IST

मुंबई - शहर परिसरात रात्रीपासून सतत पाऊस पडत असून आज (शुक्रवार) ढगाळ वातावरण राहील. तसेच काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबाबतची माहिती मुंबई महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. काल रात्रीपासून पावसाने मुंबईत पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबईत रात्रभर पाऊस पडत असून गेल्या 24 तासांत कुलाबा येथे 63.2 मिलिमीटर, तर सांताक्रूझ येथे 31.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पालिकेच्या पर्जन्य जलपामक यंत्रावर शहर विभागात 37.09, पूर्व उपनगरात 37.02 तर पश्चिम उपनगरात 27.21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत रात्रभर पाऊस पडत असला तरी अद्याप कुठेही पाणी साचल्याची नोंद झालेली नाही. पाणी साचले नसल्याने पाणी उपसा करणारे पंप सुरू करण्याची गरज भासलेली नाही. मुंबईमधील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

समुद्राला दुपारी भरती -

आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. त्यावेळी 4.75 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्रीही समुद्राला मोठी भरती असून 4.44 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात जोरात पाऊस पडत असल्यास आणि समुद्रातील वातावरणात बदल झाल्यास या लाटा उसळू शकतील. या काळात नागरिकांनीसमुद्राजवळ जाऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

हेही वाचा -मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरणही 'ओव्हरफ्लो', सातपैकी चार धरणे भरली

ABOUT THE AUTHOR

...view details