मुंबई -तीन मार्चपासून होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशनात ( Budget Session 2022 ) राज्याच्या विविध मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि विरोधी पक्ष यांच्यात ( Mahavikas Aghadi government and BJP ) गदारोळ होण्याची शक्यता आहे. मात्र यासोबतच सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार असल्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. तीन ते 25 मार्च असे पूर्ण वेळ हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असून 11 मार्चला अर्थसंकल्प सादर ( Budget will be Presented on March 11 ) केला जाणार आहे. मात्र हे अधिवेशन वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे.
- राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाचे नेते असणार आमने-सामन
महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर भारतीय जनता पक्षाकडून गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तर तेथेच या आधी भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रडारवर होते. मात्र महाविकासआघाडी आता गप्प बसणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. संजय राऊत यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमैया आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे एकमेकांकडून करण्यात आलेल्या या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नक्कीच पाहायला मिळतील, असे मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
- कथित 19 बंगल्यावरून वाद चिघळण्याची शक्यता
भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी अलिबागमधील कोर्लई गावात जाऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबागमधील कोर्लई गावात विकत घेतलेल्या जमिनीवर 19 बंगल्यांचा कर भरला आहे. जर जमिनीवर बंगलेचे नाही तर, कर का भरण्यात आला? तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती का दिली नाही? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. याचे पडसादही अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. तर याउलट खासदार संजय राऊत, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर देखील राज्य सरकारच्या तपास यंत्रणाकडून कारवाई करण्याची शक्यता निर्माण होते आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांना घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ होण्याची दाट शक्यता असल्याचे मत विश्लेषक अजय वैद्य मांडतात.
- भाजपा विरोधात काँग्रेस आक्रमक