मुंबई -गेल्या 14 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (msrtc strike) सुरू असून गेल्या 4 दिवसांपासून कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. आज कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने (msrtc employees delegation) परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. या भेटीत चर्चा सकारात्मक झाली आहे, मात्र पुढील निर्णय हा एसटी कर्मचारी घेतील, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. कोर्टाने समितीला 12 आठवड्यांची मुदत दिलेली आहे, यातील काही वेळ कमी करावा, अशी मागणी करण्यात आली. वेळ कमी करण्यासाठी सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. अजून संप मागे घेतलेला नाही. समितीचा अहवाल येत नाही तोवर सरकार काही करू शकत नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. उच्च न्यायालयाने समिती नियुक्त केली आहे. कोर्टाच्या पुढे जाता येणार नाही, असे मंत्र्यांचे म्हणणे आहे. समितीचा अहवाल योग्य आला तर कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सामावून घेऊ, निगेटिव्ह आला तर, शासनाच्या कर्मचाऱ्यांना जितका पगार मिळतो तितका पगार द्यायला सरकार सकारात्मक आहे, असे मंत्र्यांनी सांगितले आहे. आंदोलनाला लोकप्रतिनिधी म्हणून आमचा पाठिंबा आहे. सर्व निर्णय कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. कर्मचारी जे सांगतील त्याला आमचे समर्थन आहे, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.