मुंबई -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole statement about PM Modi ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण आता पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोले यांनी ‘मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो’, असे वक्तव्य केले आहे. त्याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोटोले यांनी याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक भाजप नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी पटोले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? देवेंद्र फडणवीस
पाकिस्तानच्या सीमेनजिक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो. तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही. वैचारिक - बौद्धिक उंची पण असावी लागते!’ असे ट्वीट करत फडणवीस ( Devendra Fadnavis react on nana patole statement ) यांनी पटोलेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
भ्रमिष्टासारखे नानांचे वर्तन!
या बाबत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘नेता तैसा कार्यकर्ता, त्यांचे राष्ट्रीय नेते मध्येच गायब होतात, काहीही बोलतात, परिणाम काय होईल, परंपरा काय त्या मोडल्या जातील याची काळजी करत नाहीत. त्यात त्यांचे अध्यक्ष नाना पटोले वेगळे काय करणार? मी त्यांना भ्रमिष्ट म्हणत नाही, पण भ्रमिष्टासारखे त्यांचे वर्तन सुरू आहे. पंजाबमधील घटनेला ते नौटंकी काय म्हणाले, अमित शहांवर त्यांनी आरोप केला की त्यांचाच हा कट आहे. काय बोलतो, काय अर्थ होतो, याचा काही त्यांना पत्ता नाही. भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही. आम्ही सगळ्या जिल्हाध्यक्षांना सांगणार आहोत की, आपल्या जिल्ह्यात या विषयावर आक्रमक व्हा’, असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला आहे.
याची किंमत नानांना चुकवावी लागेल!
नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान हे कुठल्या पक्षाचे नसतात तर, ते देशाचे असतात, त्याचा विसर नाना पटोले यांना पडलेला आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसची रया घालवली असून त्यांना निवडणुकीत यश भेटत नाही म्हणून हे सर्व सुरू आहे. काँग्रेस पक्ष हा एक वैभवशाली परंपरा असलेला पक्ष आहे. असे असताना जर नाना पटोले असे वक्तव्य करत असतील तर, ते फार दुर्दैवी आहे. याने सातत्याने त्यांचा बालिशपणा उघड होत आहे. याची किंमत नाना पटोले यांना चुकवावी लागेल, असेही दरेकर ( Praveen Darekar react on nana patole statement ) यांनी सांगितले.