मुंबई - 22 जुलै रोजी राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली अन् या पूर परिस्थितीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या अतिवृष्टीने 213 लोकांचा मृत्यू झाला. तर 4 लाख 35 हजार 879 लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. अशा गंभीर परिस्थितीनंतर राज्यातील नेत्यांचे दौऱ्यावर दौरे झाले. मात्र अद्याप ठोस मदतीच्या आशेत पूरग्रस्त नागरिक आहेत. अजून तरी सरकारकडून कोणतीही ठोस मदत पूरग्रस्तांना मिळाली नाही.
राज्यातील सहा जिल्ह्यांना व 496 गावांना पुराचा फटका -
राज्यात सहा जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. खास करून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. तसेच धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. 22 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यात मोठी हानी झाली. रायगडच्या तळई गावामध्ये दरड कोसळून 95 लोकांचे जीव गेले. तर तिथेच चिपळूणमध्ये मुख्य बाजारपेठेत आठ ते दहा फुटापर्यंत पाणी चढले होते. तर अद्यापही कोल्हापूर, सांगली या भागातील पाणी ओसरले नाही. राज्यात असलेल्या पूर परिस्थितीमुळे 213 लोकांना आपला जीव गमवावा लागला तर 52 लोक जखमी झाली तसेच अजूनही आठ लोक बेपत्ता आहेत. 4 लाख 35 हजार 879 लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. राज्यातील 496 गावांना पुराचा फटका बसल्याने, या गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. आज मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र अद्यापही राज्य सरकारकडून ठोस मदत जाहीर झाली नसल्या कारणाने पूरग्रस्त भागामधील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. आजही मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये दौरा करत असताना दरवर्षी येणाऱ्या समस्येमुळे नागरिकांचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे कायमस्वरूपी यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यासंबंधी उद्या मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली असून पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि एकूणच पूरग्रस्त भागातील लोकांना मदत देण्याची घोषणा या बैठकीतून केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. पूर आलेल्या जिल्ह्यामध्ये आता परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे मदतकार्य तातडीने वाढवले गेले पाहिजे, अशी परिस्थिती असते मंत्री आणि नेत्यांच्या दौऱ्यामुळे नागरिक अजूनच त्रस्त झाल्यासारखी परिस्थिती आहे. कारण मंत्र्यांचे, नेत्यांचे दौरे होत आहेत. मात्र सामान्य नागरिकांच्या हातात काहीही पडत नसल्याची खंत पूरग्रस्त भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना 22 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. धरण क्षेत्रामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणी पातळी रातोरात वाढली. त्यामुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागला आणि यामुळेच पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गावांमध्ये पाणी शिरले. तसेच रायगडमध्ये झालेल्या अति मुसळधार पावसामुळे तळई गावात दरड कोसळून 95 लोकांचा मृत्यू झाला. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत.
काय म्हणाले होते शरद पवार -
महापुरानंतर शदर पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सर्व राजकीय नेत्यांना आवाहन केले होते, की पूरग्रस्त भागाचे दौरे करू नका. त्यामुळे प्रशासन गुंतून पडते व मदत व बाचवकार्य बाधित होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते, की आम्ही दौरे केल्यानंतर तेथील प्रशासन जागे होते व प्रशासकीय यंत्रणा तत्परतेने हलते.
मुख्यमंत्र्यांचा दौरा -
24 जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडमधील तळई गावाचा दौरा केला. तर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी चिपळूणमधील मुख्य बाजारपेठेत व्यापार्यांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी कोकणवासीयांना भरघोस मदत मिळेल अशी आशा पूरग्रस्त भागातील नागरिकांना होती. मात्र तेव्हाही मदतीची घोषणा केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं होतं. त्यानंतर 28 जुलै रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्तांसाठी मोठा निर्णय घेतला जाईल, असं वाटत असताना, पूरग्रस्त भागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे पंचनामे पूर्ण होऊ शकले नाहीत. या कारणावरून राज्य सरकारकडून मदतीची घोषणा झाली नाही. एनडीआरएफच्या निकषानुसार सध्या तात्पुरती मदत पूरग्रस्त भागातील लोकांना देण्यात येत आहे. मात्र परिस्थितीचे गांभीर्य पाहता निकष बाजूला ठेवून नागरिकांना लवकरात लवकर मदतीची अपेक्षा आहे. मात्र अद्याप तरी ती अपेक्षा पूर्ण झालेली नाही. आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौर्यात तरी ते मदतीची घोषणा करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना होती. मात्र यासंबंधी पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मुंबईत बैठक घेऊन यासंबंधीची घोषणा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे.
राज्यपालांचा पूरग्रस्त भागामध्ये पाहणी दौरा -
27 जुलै रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगड आणि रत्नागिरीमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. रायगड मधील तळई गावात जाऊन राज्यपालांनी परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच चिपळूण मधील पाणी भरलेल्या मुख्य बाजारपेठच्या परिस्थितीची पाहणी केली. यावेळी राज्यपालांकडून देखील राज्य सरकारने लवकरात लवकर मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच गंभीर परिस्थिती पाहून केंद्र सरकारने लवकरात लवकर मदत करावी यासाठी केंद्र सरकारशी संवाद साधून मदत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन राज्यपालांकडून देण्यात आले आहे. मात्र अद्याप केंद्र सरकारची कोणतीही मदत आलेली नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा -
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 26 जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील दौरा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात दौरा केला होता. कोयना आणि आलमट्टी धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात असलेल्या सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. व्यापारी, दूध व्यवसायिक आणि शेतकरी यांना पुरामुळे मोठे नुकसान झाले. तसेच नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही अद्याप कोणालाही मदत जाहीर झालेली नाही. तसेच केंद्राकडून 701 कोटी रुपये जी मदत जाहीर झाली आहे, ती गेल्या वर्षी आलेल्या चक्रीवादळासाठीची असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होते.
विरोधकांचे दौरे -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर लगेचच विरोधी पक्षाने देखील आपले दौरे काढले. 25 जुलै रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी रायगड आणि रत्नागिरी या भागांची पाहणी केली. पूरग्रस्त भागात झालेल अतोनात नुकसान पाहून राज्य सरकारने लवकरात लवकर नागरिकांना मदत करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. पूरग्रस्त भागाची गंभीर परिस्थिती पाहता केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळवण्याचे आश्वासन विरोधी पक्षाकडून देण्यात आले. मात्र गुजरातला तात्काळ मदत देणाऱ्या केंद्र सरकार अद्यापही महाराष्ट्राच्या मदतीसाठी उदासीनच दिसत आहे.
पूरग्रस्तांच्या खात्यात 10 हजार जमा करणार -
पूरग्रस्त नागरिकांना अद्याप मदतीची घोषणा झाली नसली तरी, तातडीची मदत म्हणून पूरग्रस्त नागरिकांच्या खात्यामध्ये 10 हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. 29 जुलै रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं मात्र अद्याप तरी पूरग्रस्त नागरिकांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा झालेले नाहीत.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांना दिला धीर -
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 29 जुलै रोजी चिपळूणमधील मुख्य बाजारपेठेची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांच्याकडून झाला. मात्र संतप्त पूरग्रस्त नागरिकांनी राज्य सरकारने नेमकं काय केलं? तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही, यासाठी राज्य सरकार काय करणार? असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत.
रोहित पवार यांनी केला चिपळूणचा दौरा -
पूर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पूरग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे, या उद्देशाने इतर नेत्यांनी पूरग्रस्त भागांमधील दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. मात्र या आवहानाला न जुमानता आमदार रोहित पवार यांनी चिपळूणचा पाहणी दौरा केला. आवश्यक नसतानाही रोहित पवार यांनी केलेल्या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. तसेच रोहित पवार यांनी हा दौरा करून नेमकं काय साध्य केलं? असे सवालही विरोधकांकडून विचारण्यात आला आहे.
उर्मिला मातोंडकर यांचा चिपळूण दौरा -
शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कोणताही गाजावाजा न करता चिपळूणच्या नागरिकांना मदत करण्यासाठी दौरा केला. यावेळी तिकडची परिस्थिती पाहून उर्मिला मातोंडकर यांना आपले अश्रू अनावर झाले होते. अत्यंत बिकट परिस्थितीत कोकणी माणूस उभा राहण्याचा प्रयत्न करतोय त्याला मदतीची गरज असून जमेल त्यांनी पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन उर्मिला मातोंडकर यांच्याकडून करण्यात आले. तसेच यावेळी काही रोख रकमेची मदत त्यांनी नागरिकांना केली.
दिपाली सय्यद यांच्याकडून दहा कोटींच्या मदतीची घोषणा -
28 जुलै रोजी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी कोल्हापूरमधील पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी "सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट"तर्फे दहा कोटी रुपये देणार असल्याची घोषणा दीपाली सय्यद यांच्याकडून करण्यात आली आहे.