मुंबई- कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवणाऱ्या भाजपला महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीपूर्वी जोरदार झटका दिला होता. आता राज्यसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसचा प्रयोग भाजपकडून सुरू आहे. मात्र, गाफील राहिलेल्या काँग्रेसला इतर राज्यात झटका देत, सत्तेवर आलेल्या भाजपचे मनसुबे उधळून लावण्यास महाविकास आघाडी सतर्क झाली असून आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवले आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसला धक्का देण्याची ही रणनिती आहे.
विधानसभेतून राज्यसभेत जाणाऱ्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होत आहे. एकूण सात उमेदवार रिंगणात असून निवडून येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपने तीन तर शिवसेनेने दोन उमेदवार दिले. तसेच, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले. पण, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला. एकेकाळी मित्र पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप थेट लढत होणार आहे.
शिवसेनेकडे 56 राष्ट्रवादीकडे 54 आणि काँग्रेसचे 44 संख्याबळ आहे. इतर छोटे पक्ष, अपक्ष असे एकूण 16 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला. महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 169 आहे. राज्यसभेची निवडणूक लागताच आमदारांमधील नाराजी उफाळून आली. भाजपने या नाराजीचा फायदा घेण्यासाठी ऑपरेशन लोटस प्रयोग राबवायला सुरुवात केली. अनेक आमदारांशी संपर्क साधला. पण, हे आमदार भाजपकडे गेल्यास महाविकास आघाडीची नाचक्की होईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनेते मल्लिकार्जुन खर्गे, एच के पाटील यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर ऑपरेशन लोटस ब्रेक करण्यासाठी वापरलेली व्यूहरचना आखली. यामुळे भाजपचे ऑपरेशन लोटस सध्या तरी फेल ठरण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
राज्यसभेच्या विधिमंडळात भाजपचे संख्याबळ घटले आहे. भाजपकडे 106 अधिक इतर छोटे पक्ष, अपक्ष 7 असे एकूण 113 आहेत. मनसेचा एक मत भाजपच्या खात्यात जाणार आहे. यामुळे भाजपचे एकूण 114 मत होतील. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला सत्ताधारी पक्षातील 12 आमदारांची आवश्यकता आहे. हे आमदार भाजपला फोडावे लागतील. अशातच औरंगाबाद येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेचे टायमिंग साधत भाजप महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सारखा प्रयोग राबवेल, अशी आघाडी सरकारला भीती होती. महाविकास आघाडीने सरकारला पाठिंबा दिलेल्या आमदारांना सभेपूर्वीच सुरक्षित स्थळी ठेवले आहे. भाजपने यापूर्वी कर्नाटक, पंजाब सारख्या राज्यात सत्ता स्थापनेच्या जवळ असताना गाफील राहिलेल्या काँग्रेसचे बंडखोर आमदार फोडून सत्ता स्थापन केली होती. आताही विधानसभेतून राज्यसभेत जाणाऱ्या सहा जागांसाठी भाजपने तिसरा उमेदवार देऊन चुरस वाढवली आहे. इतर छोटे पक्ष, अपक्ष आमदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. भाजप यात यशस्वी होईल का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
भाजपने नेहमी गाफील राहिलेल्या पक्षांना अंधारात ठेवून सत्तेला सुरुंग लावली आहेत. राज्यसभा निवडणुकीत हाच फॉर्म्युला वापरण्याची तयारी सुरू केली. राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि एच के पाटील यांच्याशी समनव्यातुन भाजपचा डाव ओळखून आमदारांना सुरक्षित केले. तसेच अनेकांची मनधरणी सुरू असून नाराजी दूर कारण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडी सध्या तरी यात यशस्वी टायमिंग साधेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक श्रीरंग सुर्वे वर्तवतात.
हेही वाचा -BJP to field sixth candidate for Assembly elections? : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप सहावा उमेदवार रिंगणात उतरवणार?