मुंबई - राज्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून राज्यातील प्रमुख पक्षाने तरुण वर्गाकडे आपला मोर्चा वळवला आहे. अधिकाधिक तरुण आपल्या पक्षासोबत जोडला जावा यासाठी सर्वच पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. ( Local Self Government Elections ) तरुणांना सक्रिय राजकारणात आणून पक्षाच्या भूमिकेशी आणि विचारांशी एकनिष्ठ होऊ समाजसेवा करण्यासाठी अठरा वयोगटाच्या वरील तरुणांना आपल्या पक्षात आणण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि या सोबतच शिवसेना अशा सर्वच पक्षांनी वेगवेगळे कार्यक्रम आपल्या हाती घेतले आहेत.
राष्ट्रवादीकडून तरुणांच्या नियुक्त्या सुरू -गेल्या आठवड्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या कार्य अध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांची नव्याने नेमणूक केली. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडूनही मुंबई विभाग विद्यार्थी संघटनेच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. ( Youth In Politics ) तरुणांना आपल्या पक्षासोबत जोडण्यासाठी सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेसने पाऊल पुढे टाकले असून राजकारणातील तरुणांचा असलेले महत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलंच माहित आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये अधिकाअधिक राज्यातला तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत उभा राहिला पाहिजे यासाठी शरद पवार यांनी अनेक कार्यक्रम घेण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
तरुणांना 50% संधी - येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जवळपास 50 टक्के जागा यात तरुण नेतृत्वासाठी ठेवाव्यात अशा सूचना खुद्द शरद पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्या आहेत. तर, विधानसभा निवडणुकीत देखील अधिकाधिक तरुणांना संधी मिळेल अशाप्रकारे तिकीट वाटप केले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये तरुणांना 50% संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तरुण नेतृत्वाची चाचपणी देखील सुरू झाली आहे.
तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यक्रम -राज्यातील तरुण जास्तीत जास्त आपल्या पक्षाशी जोडला जावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभरात कार्यक्रम आखायला सुरुवात केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून " शरद युवा यात्रा" या कार्यक्रमांतर्गत राज्यभरातील करून सोडण्याचा प्रयत्न केला जातोय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद पवार यांचे राजकारणातील योगदान त्या योगदानाचा महाराष्ट्रासाठी असलेले महत्त्व हे पटवून देण्याचा काम सध्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजकारणात येणाऱ्या नवतरुणांना करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसकडून राबविण्यात येत आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकी या शंभर जागा - राज्य घरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून "क्रीडा महोत्सव" भरवण्यात आला. या कार्यक्रमाच्या अंतर्गत राज्यातील तरुण खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम करण्यात आले. राज्यभरातील तरुण खेळाडू तसेच क्रीडाप्रेमी तरुणांना पक्षाची जोडण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून "सुपर 100" हा कार्यक्रम देखील तरुणांसाठी राबविण्यात येतोय. या कार्यक्रमाच्या अंतर्गत 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पडले असलेल्या शंभर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हा कार्यक्रम राबवला जातो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकी या शंभर जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जिंकून यावा यासाठी त्या जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोडण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. जेणेकरून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत याचा थेट फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होईल.
तरुणाला संधी मिळेल - अशाप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना डोळ्यासमोर ठेवून अनेक कार्यक्रम पक्षाच्या मार्फत राबवले जात आहे. तसेच तो तरुण पक्षामध्ये केवळ कार्यकर्ता बनून राहू नये यासाठी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असतील किंवा मग विधानसभा निवडणुका असतील या सर्व निवडणुकांमध्ये त्या तरुणाला संधी मिळेल यासाठी देखील राष्ट्रवादी काँग्रेस कडून प्रयत्न केले जात आहेत.
तरुणांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी भाजप प्रयत्नशील -भारतीय जनता पक्षाने ही नेहमीच तरुणांना केंद्रस्थानी ठेवून आपल्या कार्यक्रमाची आखणी केली आहे. प्रत्येक निवडणुकांमध्ये अधिकाधिक तरुण भारतीय जनता पक्षाशी जोडला जावा यासाठी अनेक कार्यक्रम पक्षाच्या मार्फत राबवले जातात. आता राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यामुळे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या असलेल्या तरुणांसाठी तमाम योजना तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चा कडून आखले जात आहे. भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यावर राज्यातील तरुणांना पक्षाची जोडण्याची जबाबदारी टाकण्यात आली असून यासाठी युवा मोर्चाच्या अंतर्गत अनेक कार्यक्रम भारतीय जनता पक्ष राबवत आहे.
निवडणुकांमध्ये राजकारणाचा अनुभव असलेले नेतेमंडळी - राजकारणाच्या मुख्य प्रवाहात 18 वर्षे वयोगटातील च्या वरील तरुणांना आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जात असून, होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिकाधिक तरुणांना संधी देण्यासाठी पक्ष प्रयत्न करणार असल्याचे विक्रांत पाटील म्हणत आहेत. आतापर्यंत अधिकाधिक तरुणांना संधी देणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला ओळखल आहे. प्रत्येक वेळीस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असोत किंवा विधानसभा निवडणुका असोत. या निवडणुकांमध्ये राजकारणाचा अनुभव असलेले नेतेमंडळी आणि राजकारणात उदयन्मुख होणारी तरुण मंडळी यांची सांगड घालत उमेदवार दिले जातात.