मुंबई - राज्यात सध्या हनुमान चालीसा (Hanuman Chalisa Recitation) आणि अजान यावरून राजकारण तापले आहे. प्रत्येक पक्षाने आपली भूमिका घेत आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2022 Celebration) मोठ्या उत्साहात साजरी केल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणानंतर राज्यात हनुमान चालीसा, अजान आणि लाऊडस्पीकरचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला होता. त्यानंतर लगेचच आज हनुमान जयंती असल्यामुळे सर्वाच राजकीय पक्षांसाठी हा मुद्दा अग्रस्थानी होता. यावरून आज अनेक आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले.
मनसे अन् शिवसेनेत जुंपली - पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात मनसेकडून हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. अजान अन् हनुमान चालीसाचा मुद्दा राज ठाकरे यांनी उचलल्यामुळे आज त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, यावरून मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसेला टोला लगावला आहे. सध्या महाराष्ट्राची शांतता बिघडवण्याचे काम बी आणि सी टीम करत आहे. हिंदुत्व ही श्रद्धेची गोष्ट आहे. राजकारणासाठी आम्ही हिंदुत्व करत नाही. 'रघुकुल रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जाये,' हे आम्ही नेहमीच करत आलो आहोत. मात्र, शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बी आणि सी टीमला जनतेने जास्त महत्त्व देऊ नये, असा चिमटा त्यांनी मनसेला काढला आहे.
शिवसेना अन् राणा दाम्पत्यामध्ये रंगली - यात राणा दाम्पत्य यांनीदेखील उडी घेतली होती. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान दिले होते. तसेच त्यांनी हनुमान चालीसा पठण केली नाही तर, मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशाराही राणा दाम्पत्यांनी दिला होता. यावरून शिवसेनेनेही राणा यांना प्रत्युत्तर दिले आहे. मातोश्री आमचे श्रद्धास्थान आहे. येथे येऊन कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसैनिक ते कधीही सहन करणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले आहे. याला परत नवनीत राणा यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावे, इतकीच अपेक्षा मी त्यांच्याकडून केली आहे. माझ्या या मागणीवरून मातोश्रीबाहेर शिवसैनिक एकत्र आले. मी हनुमान भक्त आहे, दहशतवादी नाही असेच मला शिवसैनिकांना सांगायचे आहे, असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.