महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरक्षण प्रश्नावर राज्य सरकार अडचणीत, तर केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आघाडीचे नेते! - bjp on Mahavikas Aghadi

राज्य सरकारसमोरच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा शांत होत नाही तोवर ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारसमोर उभा राहिला आहे.

mahavikas aghadi government
महाविकास आघाडी

By

Published : Jun 28, 2021, 6:16 PM IST

Updated : Jun 28, 2021, 10:24 PM IST

मुंबई - मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाकडून थेट राज्य सरकारवर आरोप केले जात आहेत. तर तिथेच केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून आघाडी सरकारच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मतं राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी मांडले आहे. विरोधी पक्षाच्या या आक्रमक भूमिकेवर राज्य सरकारचा सावध पवित्रा पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -Antilia Explosive Scare : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्य सरकारसमोरच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा शांत होत नाही तोवर ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारसमोर उभा राहिला आहे. तिथेच पदोन्नती आरक्षणाबाबत राज्य सरकार न्यायालयीन लढाईच्या तयारीत आहे. तर तिथेच महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेची टांगती तलवार आहे. अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत. मात्र, रविवारी 27 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार हे समन्वयाने काम करत आहे. राज्य सरकारसमोर येणाऱ्या अडचणी समन्वय समितीच्या माध्यमातून सोडवल्या जात आहेत. त्यामुळे हे सरकार आपलं पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आज खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यातील विरोधी पक्षनेते गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. तीनही पक्ष समन्वयाने महाविकास आघाडी सरकार चालवत आहेत. त्यामुळे संभ्रम पसरवण्याचे काम विरोधकांकडून केले जात असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. तर सध्या आरक्षणाचा मुद्दा आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेची असलेली करडी नजर यामुळे महाविकास आघाडी सरकार दबावात असल्याचं मत राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी मांडले आहे.

प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत

हेही वाचा -वादाला फुटले नवे तोंड; ट्विटरने नकाशातून वगळले जम्मू काश्मीर!

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकार कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू झाला आहे. एकीकडे छत्रपती संभाजीराजे यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बातचीत करून छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेला आंदोलनाचा पवित्रा मागे घेण्यास त्यांचं मतपरिवर्तन केलं. मात्र दुसरीकडे इतर मराठा समाजाच्या संघटनांकडून राज्य सरकारला वेळोवेळी आंदोलनाचा इशारा दिला जातोय. 27 जून रोजी शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारच्या विरोधात मुंबईत मोठी बाईक रॅली केली. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मतं वैद्य यांनी व्यक्त केले आहे. तर तिथेच केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डेटा उपलब्ध होत नसल्याकारणाने राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचं महाविकास आघाडी नेत्यांकडून सांगण्यात येत असले तरी, विरोधी पक्षनेत्यांकडून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबाबत राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे ओबीसीचे आरक्षण रद्द झाले असा थेट आरोप विरोधी पक्षनेते यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचे खापर राज्य सरकारवर फोडण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून सुरू आहे. भाजपच्या आरोपांचे खंडन करण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडत असल्याचे मतं राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना नवाब मलिक
  • आघाडी सरकारच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेची टांगती तलवार -

अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. तसेच त्यांना चौकशीचे समन्सही बजावला आहे. तर तिथेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर देखील ईडीने चौकशीचा फास आवळला आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी आता भाजपच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणेचा उपयोग करून भाजप महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सातत्याने सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. केंद्रात असलेल्या भाजपच्या सत्यामुळे राज्यात केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून महाविकास आघाडी सरकारला जास्तीतजास्त त्रास कसा देता येईल यासाठी विरोधी पक्षाकडून प्रयत्न केले जात असल्याचे मत विश्लेषक अजय वैद्य यांनी मांडले आहे.

  • अजित पवार यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचा प्रस्ताव -

भाजपच्या प्रदेश कार्यकारणीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात सीबीआय चौकशीचा प्रस्ताव पास करण्यात आला आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक असलेल्या सचिन वाझे याचे कथित पत्र समोर आले होते. त्या पत्रावर अजित पवारांच्या निकटवर्तीय असणाऱया एका व्यक्तीने अवैधरित्या गुटखाविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून 100 कोटी जमा करण्याचे सांगण्यात आले असल्याचा आरोप या कथित पत्रातून करण्यात आला होता. याबाबत सीबीआय चौकशी व्हावी म्हणून भाजपच्या नेत्यांकडून मागणी करण्यात येणार आहे.

  • प्रताप सरनाईक यांच्यावर असलेले आरोप -

प्रताप सरनाईक यांनी एनएसईएलमध्ये 250 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केला होता. या घोटाळ्यांच्या पैशातून त्यांनी जमीन खरेदी केल्याचा आरोपही किरीट सोमैय्या यांच्याकडून करण्यात आला. याबाबत ईडीकडून प्रताप सरनाईक यांच्या ठाण्याच्या आणि मुंबईच्या अशा दोन्ही घरांवर छापेमारी करण्यात आली होती. याबाबत वेळोवेळी ईडी कडून ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांना देण्यात आले आहेत.

  • अनिल परब यांच्यावर भाजपच्या आरोपांची टांगती तलवार -

अनिल परब यांनी लॉकडाऊन दरम्यान रत्नागिरी दापोली येथे १० कोटींचा बेकायदेशीर रिसॉर्ट बांधले असल्याचा आरोप खासदार किरीट सोमैय्या यांनी केला आहे. याबाबत किरीट सोमैय्या यांच्याकडून सीबीआय आणि आयकर विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच वेळोवेळी सचिन वाझे प्रकरणात देखील अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.

  • रवींद्र वायकर यांनी अवैध्यरित्या अलिबागमध्ये बंगले खरेदी केल्याचा आरोप -

अलिबागमधील कोलई गावात अन्वय नाईक यांच्याकडून ३० जमिनीचे करार करण्यात आले. जमिनीचे करार, ग्रामपंचायतमध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्यांच्यावरील १९ बंगले याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही सर्व माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला. 19 बंगल्यांची प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी रविंद्र वायकर यांच्या पत्नी सह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावाची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत. मात्र, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या प्रतिज्ञापत्र मध्ये काहीही उल्लेख केलेला नाही. या प्रॉपर्टी बाबत रवींद्र वायकर आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

  • संजय राऊत यांच्या पत्‍नीला आली होती ईडीची नोटीस-

पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी संशयित असलेले प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांच्या पत्नीने 55 लाख रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले होते. या 55 लाख रुपयांच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. यासंबंधी दोनवेळा वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या होत्या. ईडीची चौकशी होण्याआधीच हे 55 लाख रुपये वर्षा राऊत यांनी परत केले होते.

भाजपकडून सातत्याने होणाऱ्या अशा आरोपांमुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेमुळे प्रताप सरनाईक यांच्याकडून हे पत्र लिहिले गेले असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. भाजपकडून सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप केले जात आहेत. यासोबतच केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवण्यात येत असल्याचा आरोप आता थेट प्रताप सरनाईक यांच्याकडून करण्यात आला. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांवर वाढत्या दबावामुळे येणाऱ्या काळात शिवसेना इतर पर्यायांचा विचार करू शकते का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

5 आणि 6 जुलै रोजी होणाऱ्या दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्य सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षाकडून सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनात राज्य सरकारचा नेमका काय पवित्र असणार आहे? यावरून महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Last Updated : Jun 28, 2021, 10:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details