महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय वातवरण दुषित करु नका, राजकीय नेत्यांसह विश्लेषकांनी व्यक्त केली चिंता

राज्यात धार्मिक वादाचा ( Maharashtra Religious Politics ) मुद्दा उफाळून आला आहे. राज्यकर्त्यांकडून एकमेकांवर अश्लाघ्य भाषेत टिकांचा भडिमार सुरू आहे. दिवसेंदिवस आरोप - प्रत्यारोपांचा स्तर ही घसरला आहे. राज्यातील जनता याला वैतागली असताना ज्येष्ठ राजकीय नेत्यांसह राजकीय विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली जात आहे.

By

Published : May 4, 2022, 9:23 PM IST

Maharashtra Politics
Maharashtra Politics

मुंबई -राज्यात धार्मिक वादाचा ( Maharashtra Religious Politics ) मुद्दा उफाळून आला आहे. राज्यकर्त्यांकडून एकमेकांवर अश्लाघ्य भाषेत टिकांचा भडिमार सुरू आहे. दिवसेंदिवस आरोप - प्रत्यारोपांचा स्तर ही घसरला आहे. राज्यातील जनता याला वैतागली असताना ज्येष्ठ राजकीय नेत्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. देशात लोकशाही पध्दत अस्तित्वात असून सत्तापालट मतपेटीतून होते. त्यामुळे धार्मिक वाद निर्माण करून राजकारण रक्तरंजीत करू नका, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय नेत्यांकडून आताच्या सर्व पक्षीय राजकारण्यांचे कान पिळले जात आहेत.

राजकारण म्हटले म्हणजे पक्षीय वाद असतातच आणि ते असलेच पाहिजे परंतु त्यांचा स्तर केवळ राजकारणापुरता मर्यादित असला पाहिजे. एकमेकांवर शाब्दिक वाद, आरोप -प्रत्यारोप यापूर्वी अनेक वेळा झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक वेगळ्या पक्षाचे असल्यामुळे हे वाद होतातच त्यात काही वावगे नाही. गेल्या काही वर्षांपासून राजकारणाचा स्तर पूर्णतः घसरला आहे. सर्व क्षेत्राला दुर्दैवाने राजकारणाचा विषारी स्पर्श झाल्याने द्वेषाचे, विद्वेषाचे, विध्वंसक असे राजकारण सुरू झालेले आहे. त्यामुळे सध्याची राजकीय स्थिती अतिशय चिंता करण्यासारखी आणि मनाला वेदना देणारी असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे.

राज्यातील सध्याचे राजकारण अतिशय चिंताजनक आहे. काही लोक खोटं बोलण्याची परिसीमा गाठत आहेत. आपण कशा रीतीने खोटं बोलतोय, खोटं बोलण्याचा समाज माध्यमात काय परिणाम होईल, याचा विचार केला जात नाही. सर्वांनी गांभीर्याने याबाबत विचार करायची वेळ आली आहे. सत्ता येईल, जाईल. पण भारताच्या लोकशाहीची जी मूल्ये, परंपरा अनंत काळापासून चालत आली आहे. ती जपायला हवी. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळापासून एकमेकांना विचारून राज्य करण्याची पध्दत आहे. देशात मातीत, वाऱ्यात माणसाच्या मनामनात लोकशाही आहे. येथे मतांच्या पेटीतून सत्तांतर होते. रक्तरंजित करून सत्ता बदल होत नाही, राज्यातील सध्याच्या सर्व पक्षीय राजकारण्यांनी हे लक्षात घ्यायला हवे. राज्यापासून केंद्रातील सरकारे आज मतपेटीच्या माध्यमातून बदलली आहेत. लोकशाहीची प्रगल्भता दाखवून देणारे लोक देशात आहेत. मात्र सध्याची स्थिती बघून जनता त्रस्त असून चिंतेत आहेत, असे भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाण म्हणाले. मात्र राजकारणाचा स्तर घटण्यामागे इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर खापर फोडले. कधीही समाजाला भेडसावणारे प्रश्न माध्यमे विचारत नाहीत, अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

राज्यात महागाई इंधनाचे दर वाढत आहेत. कोणताही राजकीय पक्ष त्याची दखल घ्यायला तयार नाही. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची उणी धुणी काढत आहेत. अपमानास्पद टीका केली जात आहे. राजकारणातून एकमेकांना उखडून टाकण्याची स्पर्धा लागली आहे. भाजपकडून हा प्रकार वाढीस लागला आहे. व्यक्तीगत हल्ला करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. लोकांच्या प्रश्नांपेक्षा धार्मिक गोष्टींच्या आधारे वातावरण बिघडवले जात आहे. मतदारांना केंद्रित करण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न अतिशय अश्लाघ्य आहे. महाराष्ट्राचे राजकारण कायम सलोख्याचे, परस्परांच्या समजुतीचे राहिलेले आहे. पूर्वी विरोधी पक्ष पातळी सोडून बोलत नव्हते. सत्ताधारी विरोधकांना सांभाळून, त्यांच्या सूचनांचा आदर करून पुढे वाटचाल करत होती. आता एकमेकांना संपवण्यासाठी सज्ज झालो आहोत, अशा अविर्भावात परस्परांवर हल्ले चाललेले आहेत, असे जनता दलाचे नेते प्रभाकर नारकर यांनी सांगितले. जनतेच्या चुकीमुळे राजकीय नेत्यांचे फावले आहे. एकेकाळी डाव्या पक्षांची परंपरा होती. त्याला संपवण्यास जनतेला जबाबदार धरल्यास वावगे ठरू नये. कारण, जनतेला त्यांच्या योग्यतेनुसार राज्यकर्ते मिळतात, असेही नारकर म्हणाले.

जवळजवळ ४५ वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहे. सन १९७८ पासून आजतागायत ९ राज्य सरकार पाहिली. मात्र अराजकता असा विषय आजपर्यंत राहिलेला नाही. २०१९ नंतर जी उलथापालथ झाली आणि त्यानंतर अस्वस्थता निर्माण करण्याचा जो पर्यंत आहे. तो कधीच पाहिला नाही. कोणतेही राज्य प्रगतीपथावर न्यायचे, औद्योगिक करणात अग्रेसर व्हायचे असेल तर सुख, शांती आणि शांतता असायला हवी. मात्र सत्ता मिळाली नाही, म्हणून विरोधी पक्षाकडून जी खदखद सुरू आहे. राज्य अशांत करण्याचा प्रयत्न करायचा. दंगली घडवून आणायच्या आणि महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला लावायची. राज्याच्या हितासाठी आणि भविष्याकरिता योग्य नाही, असे ठाम मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी मांडले. तसेच देशात महाराष्ट्र हा प्रगतशील राज्य आहे. त्यामुळे येथील राजकरण्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला नख लावायचा प्रयत्न करू नका, असे आवाहन माजी मंत्री देशमुख यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील राजकारण विद्वेषाचे, जाती - जातीत भांडण लावण्याचे, परस्परांच्या मनात संशय निर्माण करण्याचे, सत्ता आणि सूत्र आपल्या हातात राहील या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जो मिळेल तो मार्ग अवलंबला जातो आहे. आज राजनीती सत्तेसाठी कुटील आघात करण्यापर्यंत पोहचली आहे. काही कारण नसताना एकमेकांच्या चारित्र्यवर शिंतोडे उडवणे, विरोधकांवर टीका करताना अश्लील, अश्लाघ्य, शिवराळ भाषा वापरण्याची पध्दत रूढ होऊ लागली आहे. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. अनेकांना यापूर्वी विरोध झाला आहे. पण लोकशाही पध्दतीने. लोकसभेतील भाषणे पाहिले तर सत्ताधारी - विरोध एकमेकांच्या विचारांवर आघात करत होते. विचार कसे घातक आहेत, हे पटवून देत होते. लोकशाहीमध्ये परस्परांना विरोध करणे समजू शकतो. परंतु, विचाराला विरोध व्हायला हवा. शेती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, सुरक्षा आदीचे धोरण कसे चुकीचे आहे, यावर आवेशाने सांगणे समजू शकतो. पण समाजाला पुढे नेणारे, देशाचा आर्थिक, सामाजिक विकास करणारे कोणतेही मुद्दे काढायचे आणि त्यावर विध्वंसक असे मते निर्माण करण्याचा पायंडा राज्याच्या राजकारणात पडू लागला आहे, हे चिंताजनक आहे, असे मत राजकिय विश्लेषक तथा ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग सुर्वे मांडतात.

हेही वाच -Sandeep Deshpande Clarification : महिला पोलीस कर्मचारी धक्काबुक्की प्रकरणी संदिप देशपांडेंचे स्पष्टीकरण, म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details