मुंबई -राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये टोकाचा ( Shivsena BJP Dispute ) संघर्ष सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला जेरीस आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. शिवसेनेकडून ही भाजपला तोडीस तोड उत्तर देऊन नामोहरम केले जाते आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बची ( Devendra Fadnavis Pendrive Bomb ) मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी हवा काढल्यानंतर शनिवारी किरीट सोमैयांनी केलेल्या ( Kirit Somaiya Stunt In Dapoli ) स्टंटबाजीमुळे भाजप काहीसे बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे, असे मत वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अरविंद सुर्वे ( Arvind Surve ) यांनी व्यक्त केले.
सोमैय्यांची स्टंटबाजी -शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप सोडताना दिसत नाही. मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. गेले 25 वर्ष सत्ता अबाधित राखणाऱ्या शिवसेनेच्या कारकीर्दीतील विविध घोटाळ्यांची मालिका भाजप चव्हाट्यावर आणत आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी लाऊन मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप केला जातो आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे आगामी मुंबई महानगर पालिकेची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळेच मंत्री परब यांच्या बदनामीवर भाजपने भर दिल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातो आहे. दापोली येथील बेकायदेशीर रिसॉर्टवर भाजप नेते किरीट सोमैया यांनी कारवाईचा इशारा दिला होता. शनिवारी प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीला पोहचले. मात्र, कारवाई पेक्षा सोमैयांची केवळ प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी सुरू असल्याच्या जोरदार प्रतिक्रिया उमटल्या.
फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब फुटलाच नाही - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकले. महाविकास आघाडी सरकारकडून भाजप नेत्यांना विविध प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी विधिमंडळात केला. गिरीश महाजन यांच्या संदर्भातील कारवाई सुरू असल्याचे 125 तासाचे व्हिडिओ पेन ड्राईव्ह द्वारे सभागृहाला सादर केले. डॉ. मुदस्सीर लांबे यांचा ऑडिओ क्लिप असलेला दुसरा पेन ड्राइव्ह बॉम्ब टाकला. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दोन्ही पेन ड्राईव्हबाबत स्पष्टीकरण देताना, गिरीश महाजन पेन ड्राइव्हची सीआयडी चौकशी लावली. तसेच गिरीश महाजन यांची केंद्र सरकारनेच 2017 मध्ये चौकशी लावली आहे. तर डॉ. लांबे देखील फडणवीस सरकार काळात निवडून आल्याचे सांगत फडणीसांच्या आरोपांची हवा काढून टाकली. फडणवीस बॅकफूटवर गेले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार बॅटिंग करत प्रत्यूत्तर दिले. मंत्री नवाब मलिकांना आज देशद्रोही ठरवणाऱ्या फडणवीस यांनी सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली. तेव्हा नवाब मलिक जवळचे वाटले का? अशा शब्दांत जाब विचारला. महाविकास आघाडीला जेरीस आणण्याचे फडणवीसांचे प्रयत्न यामुळे सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले.