मुंबई - देशात धार्मिक मुद्द्यांचे राजकारण सुरू आहे. महाराष्ट्र देखील यात मागे राहिलेला नाही. आधीच अयोध्येतील राम मंदिर ( Ram temple in Ayodhya ) आणि हिंदुत्वाच्या मुद्यांवर ( Hindutva Issues BJP ShivSena ) भाजपा-शिवसेनेत खडाजंगी सुरू आहे. अशातच मनसेनेही ( MNS ) यात उडी घेत अयोध्येला जाण्याची घोषणा केल्याने वाद शिगेला पोहचला आहे. त्यामुळे आयोध्येत मोठा कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र भाजप, शिवसेना आणि मनसेत चढाओढ लागल्याचे दिसून येत आहे.
देशात २०१४ मध्ये हिंदुत्वाची लाट उसळली. भाजपा सत्तेत आली आणि हिंदुत्वाचे राजकारण सुरू झाले आहे. हिंदुत्वाचा मुद्दा म्हणजेच सत्तेचा राजमार्ग असे एकंदरीत समीकरण दिसून येत आहे. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडच्या निवडणुकांमध्ये दिसून आले. महाराष्ट्रात शिवसेनेचे आजपर्यंतचे राजकारण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चालले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सातत्याने मुस्लिमांवर सडकून टीका करायचे. परंतु, भाजपाने २०१९ मध्ये शिवसेनेला सत्तेतून बाजूला करण्यासाठी फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी करत सत्ता आणली. याचे उट्टे काढण्यासाठी शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्षासोबत आघाडी करत हादरा दिला. हातून महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने भाजपाकडून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित होतो आहे. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर भाजपाचे सर्व प्रयत्न असफल होताना दिसत आहेत.
मनसेची अयोध्यावारी! :कट्टर हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या शिवसेनेने धर्म निरपेक्षांसोबत महाराष्ट्रात युती केली. शिवसेनेच्या हिंदुत्वाची उणीव भरून काढण्यासाठी राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यांनंतर हिंदुत्वाची कास धरली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या मत विभाजनासाठी भाजपा आणि मनसेचे प्रयत्न आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वारंवार भाजपाचे मनसुबे उधळून लावले आहेत. त्यामुळे मनसेचा अयोध्येचा दौरा महाराष्ट्रात किमया करेल का, हा प्रश्न आहे.