मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 'ईडी'च्या चौकशीला आज बोलावले आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेच्या मुख्यालयालाही पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
राज ठाकरेंच्या 'ईडी' चौकशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका मुख्यालयालातही चोख पोलीस बंदोबस्त लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभा घेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शाह यांच्या विरोधात राजकीय वातावरण तापवले होते. त्यामुळे सरकार त्यांच्या विरोधात नाराज होते. त्यामुळे कधी ना कधी राज ठाकरे यांना ईडीच्या फेऱ्यात अडकवले जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.
दादर येथील कोहिनूर मिलच्या खरेदी-विक्री प्रकरणी मागील आठवड्यात राज ठाकरे यांना ईडीने चौकशीची नोटीस बजावली होती. आज ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी पार पडेल. त्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ईडीचे कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात असल्याने, या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासोबतच, मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेरही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
याआधी, केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यावर मुंबईत हाय अलर्ट देण्यात आला होता. त्यावेळीही मुंबई महापालिकेबाहेर असाच बंदोबस्त ठेवण्यात आला होता.