महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानांना आनंदाची बातमी, 'या' कारणांने पोलीस आयुक्तांनी दिली पगारवाढ

मुंबई पोलीस दलातील जवानांच्या पगारातून बेस्ट भत्ता कपात करण्यात येत होता. मात्र अनेक पोलीस दलातील जवानाकडे वाहने आहेत. तर काहीजण लोकल ट्रेनमधून प्रवास करत असल्याचेही जवानांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले होते.

Police Commissioner
पोलीस आयुक्त संजय पांडे

By

Published : Jun 3, 2022, 4:38 PM IST

मुंबई - शहरातील पोलीस दलाच्या जवानांचे बेस्ट बसमधून प्रवास करण्यासाठी 2700 रुपये तर अधिकाऱ्यांचे 5200 रुपये कपात करण्यात येत होते. मात्र अनेक जवानांकडे वाहने आहेत, तर काही लोकलने प्रवास करत असल्याने हा प्रवास भत्ता कपात न करण्याची मागणी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे करण्यात येत होती. अखेर कर्मचारी अधिकाऱ्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस आयुक्तांनी हा प्रवास भत्ता कपात न करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही अप्रत्यक्ष पगारवाढच मिळाली आहे.

पोलिसांच्या पगारातून बेस्ट भत्ता होत होता कपात -पोलीस दलातील जवानांच्या पगारातून बेस्ट भत्ता कपात करण्यात येत होता. मात्र अनेक पोलीस दलातील जवानाकडे वाहने आहेत. तर काहीजण लोकल ट्रेनमधून प्रवास करत असल्याचेही जवानांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले होते. त्यामुळे फार कमी जवान सरकारी किंवा वैयक्तिक कामासाठी बेस्टच्या बसमध्ये जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. यामुळे त्यांच्या पगारातील बेस्टचा हिस्सा त्यांना देण्याची मागणी जवानांनी केली होती. यावरच पोलीस आयुक्तांनी आढावा घेऊन त्यानंतर नवा आदेश जारी केला आहे.

बेस्टला बसणार आणखी फटका -यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांना सुविधेमुळे सार्वजनिक शासकीय गाड्यांमधून तिकीट न काढता निशुल्क प्रवास करता येत होता. मात्र यामुळे जे कर्मचारी आणि अधिकारी बेस्ट किंवा परिवहन विभागाच्या बसने प्रवास करत नव्हते, त्यांच्याही खात्यातून हे पैसे वजा होत असल्याने त्याचा फटका पोलिसांना बसत होता. बेस्टला मुंबई पोलिसाच्या वतीने महिन्याला 1 लाख रुपये मिळत होते. मात्र आता कपात बंद केल्यामुळे नियमित मिळणारे 1 लाख रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे अगोदर तोट्यात असणाऱ्या बेस्टला आणखी फटका बसणार आहे.

आता करावा लागणार तिकीट काढून प्रवास -आता वित्त विभागाने मोठा निर्णय घेत हा निशुल्क प्रवास बंद केला आहे. ज्या पोलिसांना बस किंवा बेस्टचा वापर करायचा आहे. त्यांनी तिकीट काढून प्रवास करावा असा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक शासकीय वाहतुकीच्या नावाखाली पोलीस कर्मचाऱ्यांच्या खात्यातून 2700 रुपये आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या खात्यातून जे 5400 रुपये कापले जात होते ते आता कापले जाणार नाहीत. त्यामुळे पोलिसांना हा दिलासा मिळालेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details