महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Extortion Case : कुख्यात खंडणीखोर सुधीर मास्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; स्पा मॅनेजरकडे मागितली 25 हजाराची खंडणी - गावदेवी पोलीस ठाणे

कुख्यात खंडणीखोर सुधीर मास्टर उर्फ सुदई यादव याच्या गावदेवी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सुधीर मास्टर याने स्पा चालकाला दर महिना 25 हजार रुपयाची खंडणी मागितली होती.

Extortion Case
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 14, 2022, 2:33 PM IST

मुंबई - स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी 25 हजार रुपयाची खंडणी मागणाऱ्या कुख्यात खंडणीखोर सुधीर मास्टर उर्फ सुदई यादवच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गावदेवी परिसरातील स्पा मॅनेजर तिमीर जितेंद्र मारू यांनी तक्रार दाखल केली होती. सुधीर मास्टरला मदत करण्याऱ्या टॅक्सी चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. कुख्यात सुधीर मास्टरवर मुंबईत विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मालकाच्या ट्विटर हॅण्डलवर चुकीची पोस्ट -गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक स्पा असून त्या स्पाच्या मालकाच्या ट्विटर हॅण्डलवर चुकीची पोस्ट टाकण्यात आली होती. त्यामुळे स्पाचे व्यवस्थापक तिमीर मारू यांनी ती पोस्ट करणाऱयास संपर्क साधून त्याबाबत विचारणा केली. तेव्हा ती पोस्ट करणाऱया सुधीर मास्टरने मारू यांना कुलाबा येथील एका हॉटेलात भेटायला बोलावले. त्यानुसार मारू त्या हॉटेलात गेल्यावर सुधीर एका टॅक्सीतून तेथे पोहोचला. मग त्याने स्पा चालू ठेवायचा असल्यास दर महिना 25 हजार द्यावे लागतील, अशी खंडणीची मागणी करून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या मारू यांनी तेव्हा पाच हजार सुधीरला दिले. त्यानंतर 11 तारखेला त्याने मारू यांना संपर्क साधून एका टॅक्सीचालकाच्या गुगल पेमध्ये पाच हजार भरण्यास सांगितले. मग 12 तारखेला पुन्हा मारू यांना संपर्क साधून उर्वरित रक्कम घेऊन व्ही. पी. रोड येथील एका हॉटेलात येण्यास सांगितले.

सुधीर मास्टरवर खंडणीसह बलात्काराचा गुन्हा -सुधीरची दादागिरी वाढू लागल्यामुळे मारू यांनी गावदेवी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गावदेवी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी व्ही. पी. रोड येथील एका हॉटेलात सापळा रचून खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या सुधीर मास्टरला पकडले. मात्र त्याच्यासोबत असलेला टॅक्सीचालक पोलिसांच्या हाती लागला नाही. सुधीर मास्टरविरोधात शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुह्यांची नोंद असून त्यात चार खंडणी व एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. 2020 साली उपायुक्त परिमंडळ 2 यांनी सुधीर मास्टरला तडीपारदेखील केले होते. शिवाय कुलाबा पोलीस ठाण्यातदेखील एका स्पाच्या मालकास खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details