मुंबई - लॉकडाऊन काळात एकीकडे अनेकांचे रोजगार बंद पडले आहेत, तर हजारो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, याच लॉकडाऊनचा फायदा घेत एका व्यक्तीने गैरमार्गाने तब्बल 49 लाख रुपये कमवले आहे. त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने अटक केली आहे.
लॉकडाऊन काळात देशाची आर्थिक राजधानी मुंबईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आरोपीला मुंबईतील मंडाळा मानखुर्द येथील इंदिरा नगर येथून अटक करण्यात आलेले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल 5 लाख 53 हजार रुपयांचा प्रतिबंधित असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या आरोपीकडून लॉकडाऊन काळात विकण्यात आलेल्या प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीतून कमावलेल्या तब्बल 49 लाख 14 हजार रुपयांची मुद्दल सुद्धा पोलिसांनी जप्त केलेली आहे.