मुंबई - कोणताही पुरावा मागे नसताना केवळ नखात असलेल्या रक्ताच्या डागावरुन पोलिसांनी पत्नीचा खून करणाऱ्या पतीच्या मुसक्या आवळल्या. ही घटना मुंबईतील साकीनाका परिसरात उघडकीस आली आहे. रिमा यादव असे त्या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मनोज प्रजापती या मारेकऱ्याला अटक केली आहे. दरम्यान कोणत्याही प्रकारचा पुरावा नसताना अतिशय गुंतागुंतीचे हे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणल्याने मुंबई पोलिसांचे कौतुक होत आहे.
सासूसोबत झाला होता रिमाचा वाद -उत्तर प्रदेशाची 22 वर्षीय रिमाचा विवाह सहा महिन्यापूर्वी मनोजशी झाला होता. विवाहानंतर रिमा आणि मनोज यांच्यात वारंवार भांडणे होत होती. त्यामुळे रिमा ही साकीनाका येथील बारदाना गल्ली येथे भाडय़ाच्या खोलीत राहत होती. सोमवारी रात्री रिमाचा तिच्या सासूसोबत फोनवरून वाद झाला. याची माहिती मनोजला समजली. मनोज अगोदरच रिमाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तो राग डोक्यात ठेवून मनोजने रिमाच्या हत्येचा कट रचला. रिमा घरीच एकटीच राहते हे मनोजला माहिती होते.
रिमाचा असा केला खून -चारित्र्यावर संशय घेत असल्याने मनोज आणि रिमाचे भांडणे होत होते. त्यातच सासूसोबत रिमाने वाद केल्याने मनोज संतापला होता. रागाच्या भरातच तो रिमाचा खून करण्यासाठी मंगळवारी पहाटे मनोज हा तिच्या घरी गेला. चर्चा करायची असल्याचे सांगून तो रिमाच्या घरात शिरला. त्यानंतर मनोजने रिमाच्या तोंडात रुमाल कोंबून तिचा गळा चिरून हत्या केली. हत्या केल्यानंतर मनोज हा पळून गेला.
अशी उघडकीस आली खुनाची घटना -रिमाचा खून करुन मनोज घटनास्थळावरुन फरार झाला. त्यानंतर सकाळी रिमाचा मित्र तिला नास्ता देण्यासाठी तिच्या घरी आला होता. तेव्हा रिमा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्याने तात्काळ याची माहिती साकीनाका पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रिमाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख, पोलीस निरीक्षक दिनकर राऊत, उपनिरीक्षक उमेश दगडे, मोमीन, सोनावणे, शेख, कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मनोजला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली. मनोजला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.