मुंबई- बोरिवलीत वामन जोशी या हॉटेल व्यावसायिकाच्या घरी चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या नोकराला त्याच्या 2 साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. महेश चंद्र गौडा, अनिलकुमार गौडा आणि किरणकुमार गौडा, असे अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत. कुठलाही पुरावा नसताना, केवळ खून करणारे आरोपी आपापसात कन्नड भाषेत बोलत असल्याचे पोलिसांना समजताच आरोपींचा 3 राज्यात माग घेण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने मारेकऱ्यांना अटक केली आहे.
वामन जोशी खून प्रकरण : कन्नड भाषेवरून पोलिसांनी आवळल्या मारेकऱ्याच्या मुसक्या - बोरिवली
महेश चंद्र गौडा, अनिलकुमार गौडा आणि किरणकुमार गौडा यांनी हॉटेल व्यावसायिकाचा खून केला होता. या तिघांनाही बोरीवली पोलिसांनी अटक केली आहे.
मुख्य आरोपी महेश गौडाला त्याच्या गावी फ्रँकी फास्ट फुडचे हॉटेल सुरू करायचे होते. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती. गेल्या सहा महिन्यांपासून महेश गौडा हा मृत वामन जोशी यांच्या बोरिवली स्टेशनजवळ असलेल्या सद्गगुरू हॉटेलमध्ये कामाला होता. यादरम्यान वामन जोशी हे त्यांच्या घरात लाखो रुपयांची रोकड ठेवत असल्याची माहिती मिळली. त्यामुळे आरोपी महेश गौडाने त्याचे दोन मित्र अनिलकुमार गौडा, किरणकुमार गौडा या दोघांना पैशांचे आमिष दाखवत लुटीचा कट रचला.
बोरिवली परिसरात राहणारे वामन जोशी (70) हे आपल्या घरात एकटेच राहत होते. 18 एप्रिलला या तिन्ही आरोपींनी वामन जोशी यांच्या घरात शिरून त्यांची गळा दाबून हत्या केली. मात्र यादरम्यान या आरोपींना घरातून केवळ 10 हजार रुपये मिळाले होते. खून झाल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दारू प्यालेले हे तीनजण कन्नड भाषेत संभाषण करत होते. हाच धागा पकडत पोलिसांनी तपास पुढे नेला. पोलिसांनी वामन जोशी यांच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली. या दरम्यान काही दिवसांपूर्वी काम सोडून गेलेला महेश याचा फोन नंबर बंद होता. पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. महेशला शोधण्यासाठी पोलीस कर्नाटकतील त्याच्या घरी पोहोचले. मात्र तो घाबरून तेथून पळाला आणि आपल्या साथीदारांसह तामिळनाडूतील कोचीपल्ली या गावी पोहोचला. मात्र आरोपींच्या मागावर असलेल्या पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने आरोपींना अटक केली.