मुंबई -धारावीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना सोमवारी धारावी परिसरामध्ये घडली आहे. येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडील आणि भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार ( Father Son Held For Abusing Daughter ) घडला आहे. आरोपी वडील गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार करत असून भावानेही दोन वर्षांपूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीने तिच्या शिक्षकांना हा प्रकार सांगितला त्यामुळे हा प्रकार उघड झाला या प्रकरणी धारावी पोलिसांनी आरोपी भाऊ व पित्याला सोमवारी अटक केली आहे.
पिता व भावाला अटक -
हा प्रकार 2019 पासून आतापर्यंत सुरू होता. याबाबत मुलीने विश्वासाने तिचे शिक्षक व मुख्याध्यापकांना या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तिला मानसिक आधार दिल्यानंतर मुलीने या प्रकरणी धारावी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार धारावी पोलिसांनी 43 वर्षीय पिता व 20 वर्षांच्या भावाला अटक केली. तक्रारदार मुलगी 16 वर्षांची असून दोन वर्षांपूर्वी ती बॅग बनवण्याच्या कारखान्यात झोपली असताना आरोपी पित्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.