महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीला फटका बसेल? - राज यांच्या भूमिकेने मविआपुढे आव्हान

राज ठाकरेंच्या पक्षातील सक्रियतेने देशातील आणि राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज यांच्या भूमिकेमुळे मनसेचे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारपुढे आव्हान ( Anxiety in the lead due to Raj Thackeray's activism ) राहणार आहे. आगामी निवडणुकांत आता मतांच्या ध्रुवीकरणामुळे महाविकास आघाडीच्या सरकारपुढे नक्कीच आव्हान उभे केले आहे. ( In the upcoming elections, MNS will be an option for the voters. )

Raj Thackeray
राज ठाकरेंच्या सक्रियतेने आघाडीत चिंता

By

Published : May 18, 2022, 4:45 PM IST

मुंबई : निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घोषित करण्यास सांगितले होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर ते आक्टोबर महिन्यात होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुका लढवण्यासाठी तीनही पक्ष तयारी करीत आहेत. मात्र, यावेळी राज ठाकरेंचंही महाविकास आघाडीला आव्हान असणार आहे. ( Raj's political role will definitely pose a challenge to the alliance government )

राज ठाकरेंच्या राजकीय भूमिकेने पक्षांपुढे आव्हान :राज ठाकरे यांनी राज्यभरातील मशिदींवर बेकायदेशीररीत्या असणारे भोंगे काढले जावेत, अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेनंतर संपूर्ण राज्यभर राजकीय वादंग उठलं. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या सक्रिय झालेलीदेखील पाहायला मिळाली. मात्र, एकेकाळी भारतीय जनता पक्षाला कडाडून विरोध करणारे राज ठाकरे यावेळी मात्र वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळताहेत. यावेळी त्यांच्या निशाण्यावर राज्य सरकार असून खास करून महाविकास आघाडीमध्ये सामील असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांना राज ठाकरे यांनी टार्गेट केले आहे. या वर्षी गुढीपाडव्याच्या पहिल्या सभेतून त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टार्गेट केलं होतं. तर त्यानंतर झालेल्या ठाण्याच्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.

महाराष्ट्रात तयार झालेले सरकार यांचे व्यंगात्मक वर्णन : महाराष्ट्रात महविकास आघाडीचे हे तीन पक्षांचे झालेले सरकार कशा पद्धतीने एकत्र आले याचे खोचक वर्णन त्यांनी भाषणात केले. त्यातील व्यंग त्यांनी त्यांच्या शैलीत मांडले. नवरी कोणाबरोबर लग्न ठरवते आणि रात्रीत पळून जाऊन लग्न तिसऱ्या बरोबरच करते. नंतर ते लग्न मोडते एका आवाजाने, परत ठरलेल्या बरोबर लग्न करते. आणि चौथा नांदायला येतो असे त्यांनी व्यंगात्मक वर्णन करून, सर्वच पक्षांना लबाड ठरवून, आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन उभे केले होते. हे विडबंनात्मक वर्णनाला लोकांनी हसून अनुमोदन दिले. त्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताकतीने लढल्यास थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी दोन हात करायला मैदानात उतरेल, अशीच शक्यता आहे.




मविआला राज ठाकरे यांचा फटका बसेल का! :राज ठाकरे हे पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीमध्ये सक्रिय झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी त्यांच्या टार्गेटवर आहे. काही दिवसांत राज्यांमध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यभरात निवडणुकीची लगबग सुरू होईल. त्यामुळे या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण ताकदीने उतरेल अशीच चिन्ह सध्या तरी आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवडणुकांमध्ये सातत्याने पीछेहाट झाली आहे. नाशिक महानगरपालिका शिवसेनेच्या हातातून गेली. तर मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचं अस्तित्व उरलं नाही. त्यातच राज ठाकरे यांच्या सातत्याने बदलणार्‍या राजकीय भूमिका बदलत असतात त्याचा परिणाम मतदारांवर होत असतो. मात्र, नक्कीच काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष खास करून शिवसेनेची मते विभागण्यासाठी राज ठाकरे यांचा वापर करून घेईल असं मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरी यांनी व्यक्त केल आहे. खास करून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद यासारख्या शहरी भागांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मतदार आहेत. त्यामुळे या भागांमध्ये नक्कीच काही प्रमाणात महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.




जनता प्रस्थापितांना कंटाळली आहे म्हणून मनसे चांगला पर्याय :राज ठाकरे करणाऱ्या अयोध्या दौऱ्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. बाळासाहेब ठाकरे हे कधीही आयोध्याला जाऊ शकले नाहीत. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांना राज ठाकरे यांच्यामध्ये पाहिलं जातं. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या जनतेमध्ये राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत उत्साह जाणवतोय. हा दौरा राजकीय नसून अयोध्यावर असणाऱ्या श्रद्धेपोटी हा दौरा केला जातोय. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आलेलं अपयश येणाऱ्या पुढील निवडणुकांमध्ये येणार नाही. मशिदीवरील भोंगा यांचा मुद्दा थेट सामान्य जनतेच्या मनातला होता. तसेच, सध्याचं राजकारण पाहता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि प्रस्थापित पक्षांना जनता कंटाळली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलं यश मिळेल, अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी व्यक्त केली आहे. तसेच, गेल्या 3 ते 4 वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वाईट काळ होता. मात्र, तो वाईट काळ केवळ मनसेचा नसून इतर पक्षालाही या काळामध्ये मोदी फॅक्‍टरमुळे फटका बसला होता. मात्र, येणाऱ्या काळात महाराष्ट्राची जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागे उभी राहील, असा विश्वास गजानन काळे यांना वाटतोय.



मनसेचे महाराष्ट्रात अस्तित्व आहे का! :राज्यात कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाने तयारी केली आहे. मात्र, राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे त्याचा थेट फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अस्तित्व उरलंय का? असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे अपयशी ठरली आहे. याचे वैफल्य पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे यापुढे राज्यातली जनता त्यांना फारसे गंभीर घेणार नाही, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.


हेही वाचा :Indrani Mukherjee : कोण आहेत इंद्राणी मुखर्जी? ज्यांच्यावर शीना बोराच्या हत्येचा आहे आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details