मुंबई : ज्येष्ठ तेलुगु कवी वरावरा राव यांची जामीन याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीने मुंबई उच्च न्यायालयाला केली आहे. वरावरा राव यांची प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी त्यांच्या वकीलांनी केली होती. मात्र, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असे एनआयएचे म्हणणे आहे.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी एनआयएची बाजू न्यायालयात मांडली. नानावटी रुग्णालयाने दिलेल्या राव यांच्या प्रकृती अहवालानुसार, ते आता धोक्याच्या बाहेर असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देता येऊ शकेल असे अनिल म्हणाले. तसेच, महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयासमोर असे म्हटले होते, की नानावटीमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राव यांना तळोजा रुग्णालयात न नेता, जेजे-रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्याचे काहीच कारण नाही, असे अनिल यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले.
तीन याचिकांवर सुरू आहे सुनावणी..
न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर अनिल यांनी आपली बाजू मांडली. या खंडपीठासमोर तीन याचिकांवर आज सुनावणी पार पडली. राव यांचा प्रकृती अहवाल मागवणारी याचिका, प्रकृतीच्या कारणास्तव जामीन देण्यात यावा अशी राव यांची याचिका, आणि राव यांना तुरुंगामध्ये चांगली वैद्यकीय सुविधा मिळण्याच्या अधिकाराबाबत त्यांच्या पत्नी हेमलता यांनी दिलेली याचिका; अशा या तीन याचिका होत्या.
जेजे रुग्णालयावर विश्वास नसेल, तर जामीन मंजूर करा..
एनआयएच्या मागणीनंतर न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले, की राव यांना दिवसाला तब्बल २० गोळ्या दिल्या जात आहेत. राव यांची प्रकृती स्थिर राहण्यासाठी एवढ्या प्रमाणात औषधे देणे आवश्यक आहे, म्हणजेत ते केवळ औषधांवर जिवंत आहेत. त्यावर सिंह म्हणाले, की त्यांच्या वयोमानानुसार या गोळ्या घेणे त्यांना आवश्यक आहे. आपल्या घरांमधील वयोवृद्ध व्यक्तीही यांपैकी ७० ते ८० टक्के गोळ्या घेत असतात. ते पुढे म्हणाले, की न्यायालयाला जर असा विश्वास नसेल, की जेजे रुग्णालयात त्यांच्यावर चांगले उपचार होतील; तर न्यायालयाने नक्कीच राव यांना जामीन द्यावा.