मुंबई -पीएमसी बँकेत झालेल्या घोटाळ्यानंतर ग्राहकांचे पैसे बँकेत अडकले आहेत. त्यामुळे उपचारासाठीही पैसे काढता न आल्याने उपचाराअभावी ग्राहकाचा मृत्यू झाल्याचा आरोप बँक ग्रहकाच्या नातेवाईकांनी केला आहे. मुरलीधर धार असे मृत्यू झालेल्या बँकेच्या ग्राहकाचे नाव असून ते मुलूंड परिसरातील रहिवासी आहेत. दरम्यान पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर हा चौथ्या ग्राहकाचा मृत्यू झाला आहे.
धक्कादायक; उपचारासाठी पैसे नसल्याने पीएमसी बँक ग्राहकाचा मृत्यू
गेल्या काही दिवसात पीएमसी बँक घोटाळा उजेडात आल्यानंतर चौथ्या खातेदाराचा मृत्यू झाला आहे.
मुरलीधर धार यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र त्यांचे पैसे पीएमसी बँकेत अडकले आहेत. बँकेतील पैसे काढता न आल्याने मुरलीधर धार यांच्यावर उपचार करता आले नसल्याची माहिती त्यांचा मुलगा प्रेम धार यांनी दिली आहे. पीएमसी बँकेमध्ये मुरलीधर धार यांची मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवी स्वरुपात ठेवण्यात आली होती. मात्र बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे ही रक्कम काढता येत नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार होऊ शकले नव्हते. मुरलीधर धार यांना बायपास सर्जरी करण्याची गरज असल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. मात्र, उपचारासाठी पैसे नसल्यामुळे बायपास सर्जरी करता आली नाही. राहत्या घरी मुरलीधर धार यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.