मुंबई -सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या उपाय योजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती घेतली. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी मोदींनी राज्य सरकार कोरोनाविरोधात करत असलेल्या उपाययोजनांचे कौतुक देखील केले आहे.
राज्यातील ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याची मागणी
दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदींशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेल्या उपाय योजनांबाबत माहिती दिली. तसेच राज्यात ऑक्सिजनच्या आणखी पुरवठ्याची गरज असल्याचे देखील म्हटले आहे. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करत असून, त्याचा राज्याला चांगला उपयोग होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने देखील मान्य केल्या आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.