मुंबई -प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात मुंबई महापालिकेने कारवाई तीव्र केली आहे. मुंबईत ऑनलाईन फूड चैन आणि हॉटेल, रेस्टॉरंटकडून प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. प्लास्टिक विरोधी कारवाई Plastic Ban Action Mumbai आणखी तीव्र करण्यासाठी येत्या काळात हॉटेल्स, ऑनलाईन फूडवाले आता पालिकेच्या रडारवर असणार आहेत. त्याचाच भाग म्हणून हॉटेल इंडस्ट्रीचे प्रतिनिधीत्व करणारी आहार संघटना आणि ऑनलाइन फूड चैनच्या प्रतिनिधींची येत्या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत प्लास्टिकचा वापर नियंत्रणात आणण्यासाठी तसेच प्लास्टिकला पर्याय आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे.
१६०० किलो प्लास्टिक जप्त :मुंबईमध्ये २०१८ पासून प्लास्टिक बंदी आहे. त्यासाठी पालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई केली जात आहे. मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यावर प्लास्टिक बंदी विरोधातील कारवाई थांबवण्यात आली होती. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर ही कारवाई पुन्हा सुरु करण्यात आली आहे. १ जुलैपासून महापालिकेच्या बाजार आणि लायसन्स विभागाच्या कर्मचारी अधिकारी वर्गाकडून आतापर्यंत २४ हजार ठिकाणी भेटी दिल्या. या कारवाईत १६०० किलो प्लास्टिक जप्त करून ११ लाख ६५ हजार दंड वसुल करण्यात आला आहे. एकूण २३३ जणांवर पालिकेने या मोहिमेत कारवाई केली आहे.