मुंबई - आजपासून शाळा सुरू होत असल्या तरी काही दिवस मुलांशी भावनिक पातळीवर संवाद साधला जाणार आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक गरज, त्याच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध असलेली शैक्षणिक साधन-सुविधांनुसार त्यांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा शाळा सुरू करण्याबाबतचे प्रयत्न केले पण कोविड -१९ ची तीव्रता लक्षात घेवून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून आपण प्रत्यक्षपणे शाळा सुरू करू शकलो नाही, अशी खंत गायकवाड यांनी व्यक्त केली.
सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ -
ग्रामीण आणि शहरी भागातील काही शाळा आपण सुरु करीत असलो तरी काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने त्यांचे शिक्षण सुरु राहण्यासाठी "माझे विद्यार्थी माझी जबाबदारी" या अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याचा शुभारंभ करीत आहोत. विद्यार्थिनिहाय शैक्षणिक गरजा, उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांचे मुलभूत कौशल्य व अध्ययन निष्प:ती चे सर्वेक्षण करून शाळास्तरावर निश्चित व सातत्यपूर्ण आराखडा तयार करून अंमलबजावणी केली जाईल. अध्यापनाचे नियोजन, वेळापत्रक, उपस्थिती, साहित्य, पालक सहभाग, मूल्यमापन, अभ्यासेत्तर नियोजन, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शैक्षणिक सुविधा, शारीरिक आरोग्य व मानसिक स्वास्थ्यासाठीचे विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.
हे ही वाचा -पुण्यात धक्कादायक प्रकार; फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला काढलं बाहेर