मुंबई -पावसाळ्यात मुंबईमधील रस्त्यांवर खड्डे पडतात. यंदाही रस्त्यावर खड्डे पाहायला मिळत आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. मात्र, पालिका प्रशासनाने प्राप्त तक्रारींपैकी अवघ्या 414 तक्रारींचे निवारण करायचे बाकी असल्याचा दावा केला आहे.
खड्ड्यांच्या फक्त 414 तक्रारी बाकी; पालिकेचा अजब दावा
पालिका प्रशासनाने प्राप्त तक्रारींपैकी अवघ्या 414 तक्रारींचे निवारण करायचे बाकी असल्याचे दावा केला आहे. तर हा दावा खोटा असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.
महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधी महापालिकेच्या 'MCGM 24x7' अॅपवर 10 जूनपासून 2648 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पैकी 2334 खड्डे बुजवण्यात आले आहेत. तर हे प्रमाण प्राप्त तक्रारींच्या जवळपास 84 टक्के असल्याचे सांगण्यात येत आहे. फोर्ट, कुलाबा आणि कफ परेडचा समावेश असलेल्या ए वॉर्डातील रस्त्यांवर अवघे पाच खड्डे शिल्लक आहेत. बी वॉर्ड म्हणजेच पायधुनी आणि कालबादेवी परिसरात ३० खड्डे असल्याच्या तक्रारी १० जूनपर्यंत आल्या होत्या. पैकी २९ खड्डे बुजवण्यात आले असून पालिकेच्या माहितीनुसार, या भागात फक्त एक खड्डा बुजवायचा बाकी आहे. तर अंधेरी पूर्व, सहार, मरोळ आणि साकिनाका परिसरात म्हणजेच के-पूर्व वॉर्डात सर्वाधिक ३७१ खड्डे असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातील २८६ खड्डे बुजवण्यात आले आहेत. या वार्डात ८५ खड्डे बुजवायचे बाकी असून लवकरच तेही काम पूर्ण करण्यात येईल, असे पालिकेने सांगितले आहे. तसेच मुलुंड परिसरात १४ खड्डे शिल्लक असल्याचा दावा पालिकेने केला आहे. मुंलुंडमध्ये ९८ खड्डे असल्याच्या तक्रारी होत्या. पैकी ८४ खड्डे भरल्याची माहिती आहे.
दरम्यान, पालिकेचा हा दावा खोटा असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. पालिकेनं खड्ड्यांसंबंधीचा अहवाल वेबसाइटवर सार्वजनिक करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नगरसेवक रवी राजा यांनी केली. तसेच दर आठवड्याला स्थायी समितीच्या बैठकीत सुधारीत आकडेवारी सादर करावी. मुंबईत फक्त ४१४ तक्रारी असल्याचा दाव्यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून, पालिका प्रशासन खड्डे बुजवते. तसेच खड्डे बुजवणे हे पा लिकेचे कर्तव्य आहे. आतापर्यंत प्रशासनाने 84 ते 85 टक्के बुजवले आहेत. उरलेल्या तक्रारींची लवकरच दखल घेतली जाईल, अशी प्रतिक्रियी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे.