मुंबई -दरेकर यांच्याकडे निबंधकांच्या आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी संबंधित राज्य मंत्रालय विभागाकडे जाण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मुंबई बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्यामुळे प्रवीण दरेकर अडचणीत आले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी करून दरेकर यांना अपात्र ठरवत मजूर म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 35 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन जामिनदारांची हमी देण्याचे आदेश दिले होते.
दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा - दरम्यान 20 वर्षे मजूर प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर निवडून येणारे प्रवीण दरेकर हे मजूर नाहीत. अशी तक्रार आपचे नेते धनंजय शिंदे यांनी (ऑक्टोबर 2021)मध्ये केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीअंती (3 जानेवारी 2022) रोजी विभागीय सहनिबंधकांनी प्रवीण दरेकर यांना मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर शिंदे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आपल्याला बाजू मांडण्याची संधी न देताच सहनिबंधकांनी सदस्यत्व रद्द केल्यामुळे सहनिबंधकांचा अपात्र ठरवण्याबाबतचा निर्णय रद्द करावा आणि सुनावणी पूर्ण होईपर्यंत निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका प्रवीण दरेकर यांनी दाखल केली होती.