मुंबई -एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक ( Encounter Specialist Daya Nayak ) यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. कारागृहातील तीन आरोपींनी कथित अंमलीपदार्थ प्रकरणात गोवल्याचा आरोप नायक यांच्यावर केला असून एसआयटीमार्फत चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे. या याचिकेवर 18 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
याचिकाकर्त्याचा आरोप - याचिकेवर न्या. रेवती मोहिते -डेरे आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा याचिकेत नायक यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आल्याने त्यांना या प्रकरणी प्रतिवादी करण्याचे आदेश देत खंडपीठाने सुनावणी 18 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. आर्थर रोड कारागृहात असलेल्या मोहम्मद लतीफ शेख, मुस्तफा चर्निया आणि तनवीर अब्दुल पर्यानी या तीन आरोपींनी वकील घनश्याम उपाध्याय यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. दया नायक आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी चंदनाची तस्करी करताना पकडलेल्या एका आरोपीकडे पैशांची मागणी केली. हा आरोपी याचिकाकर्त्यांचा मित्र असल्यामुळे त्याने याचिकाकर्त्यांना नायक यांनी पैशांची मागणी केल्याची माहिती दिली. याचिकाकर्त्यांनी नायक यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर नायक यांनी आपल्याला अमली पदार्थांच्या प्रकरणात गोवल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.