मुंबई -राज्यात सत्तेवर येताच शिंदे सरकारने आरेमधील मेट्रो -३ चे कारशेड बनवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसापासून बंदोबस्तात आरेतील वृक्षतोड सुरू आहे. या विरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले असून रात्रभर जागर करत सरकार विरोधात निषेध नोंदवला. आरेची काळजी, आरे वाचवा, असे फलक घेऊन आंदोलकांनी सरकार विरोधात गांधी स्टाईलने आंदोलन केले. आंदोलनात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आणि पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते.
आरेतील वृक्षतोडीला नागरिकांचा विरोध -आरेतील मेट्रो कारशेड हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प. या प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. मात्र सेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आरेमधील कारशेडवरील बंदी उठवली. त्यामुळे आरेमध्ये कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. शिंदे सरकारच्या या निर्णयाविरोधात पर्यावरण प्रेमींसह मुंबईकरांनी तीव्र विरोध दर्शवला. आरे परिसरात निदर्शने, आंदोलने केली. दुसऱ्याच दिवशी पोलीसांनी आंदोलकांना हुसकावून लावले. तसेच मोठ्या बंदोबस्तात आरेतील वृक्षतोड सुरू केली. या वृक्षतोडीचे पडसाद मुंबईत उमटत आहे.
आरे वाचवण्यासाठी नागरिकांचे रात्री आंदोलन पर्यावरण प्रेमींकडून रात्रभर जागर आंदोलन -आरेला मुंबईचे फुफ्फुस समजले जाते. १८०० एकर जंगल पसरले आहे. अनेक वन्यजीव प्राणी या जंगलात वावरताना दिसतात. मात्र आरेमध्येच मेट्रोचे कारशेड उभारणीचे काम सुरू झाल्याने पर्यावरण प्रेमींकडून रात्रभर जागर आंदोलन करण्यात आले. हातात आरे वाचवा, आरेची काळजी अशा आशयाचे फलक घेऊन मुंबईसह पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर बंदी घातली असताना, आरेमधील वृक्षतोड होत असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध असेल, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. तसेच मुंबईकरांसाठी आरे वाचले पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.
आरे वाचवण्यासाठी नागरिकांचे आंदोलन नोटीस बजावण्यासाठी पोलीस विचारत आहेत नावे - शहराच्या विविध भागातून लोक निषेधाच्या ठिकाणी येत आहेत. मात्र पोलीस नोटीस बजावण्यासाठी आंदोलकांची नावे आणि पत्ते विचारत असल्याची अमृता भट्टाचार्य या आंदोलक तरुणीने दिली. नेते, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख आणि विविध गटांचे नेतृत्व करणारे लोक निदर्शने करण्याच्या परवानगीसाठी पोलिसांकडे येत आहेत. परंतु कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही त्यांना परवानगी नाकारल्याची माहिती पोलीस उपायुक्त झोन 12 सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. कलम 149 अंतर्गत जारी केले आहे. मेट्रो कारशेडसाठी मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे कोर्टात सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी सांगितले.
आरेत घुसण्याचा प्रयत्न, 19 आंदोलकांवर गुन्हा दाखल -आरे कारशेडमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. यातील तीन जणांनी कारशेडचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यासह गुरुवारी मध्यरात्री आरेत आंदोलन करण्यात आले. त्याप्रकरणीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आंदोलकांचा शोध सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सूत्राला दिली आहे.