मुंबई - जगभरात कोरोना विषाणूची दहशत आहे. भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळेच कोरोनाला रोखण्यासाठी राज्यसरकारने कालपासून संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांना गर्दी करू नये, असे आवाहन सरकारने केले. मात्र, संचारबंदी असतानाही अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी मुंबईकर गर्दी करताना दिसत आहेत.
दादर भाजी मार्केटमध्ये नागरिकांची तोबा गर्दी; संचारबंदीचे उल्लंघन हेही वाचा...मुंबई : काळ्याबाजारासाठी साठवून ठेवलेले 15 कोटींचे मास्क जप्त, चौघांना अटक
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली. मात्र, त्यानंतरही लोकांनी ही बाब गंभीरतेने लक्षात घेतलेली दिसत नाही. त्यामुळे सोमवारी राज्यात संचारबंदी लावण्यात आली असून सर्व जिल्ह्यांच्या सीमाही बंद केल्या आहेत. तसेच मुंबईतील रेल्वे, खाजगी बसेस एसटी सेवा बंद केल्या आहेत.
जीवनावश्यक सुविधा वगळता इतर सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. मुंबईतील दादर येथील भाजी बाजारात अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी मुंबई पोलिसांनी आणि येथील प्रशासनाने वेळ ठरवून दिली आहे. त्या वेळेतच गर्दी न करता नागरिकांनी बाजारात येऊन भाजीपाला खरेदी करायचा आहे. मात्र, नागरिक नियमांचे पालन न करता बाजारात गर्दी करत आहेत.