मुंबई -पेगॅससच्या मुद्यावरून देशातील आणि राज्यातील राजकारण तापू लागले आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर गंभीर आरोप केले. पेगॅससच्यामुद्द्यावरून केवळ भारत सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. संसदेचे अधिवेशन चालू न देण्याचा काम विरोधक करतात. विरोधकांना चर्चेत कोणताही रस नसून, केवळ विरोधकांकडून गदारोळ घातला जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच फोन टॅपिंगचे आरोप मनमोहन सिंग सरकारवरही झाल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली.
'अधिवेशनाच्या एक दिवस आधी रिपोर्ट कसा?' -
पेगॅसस फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी गदारोळ माजवला आहे. मात्र, पेगॅसस फोन टॅपिंग मुद्दा समोर आणून भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचे षड्यंत्र केले जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. संसदीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी नेमके हे वृत्त कसे काय समोर आणले गेले? याबाबतदेखील देवेंद्र फडणीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशात असलेला टेलिग्राफ कायदा हा अतिशय कडक असून केंद्र सरकारकडून या कायद्याअंतर्गत अधिकृत फोन टायपिंग केले जातात. अनधिकृतपणे कोणतेही फोन टायपिंग केले जात नसल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'विरोधक संसदेचे काम होऊ देत नाही' -
देशात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, त्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी विरोधकांनी पेगॅससच्या फोन टॅपिंगचा मुद्दा वर काढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. विरोधकांनी तिखट प्रश्न विचारावे, त्याला केंद्र सरकार उत्तर देण्यासाठी तयार आहे, असे पंतप्रधानांनी सांगूनसुद्धा विरोधक केवळ संसदेचे काम बंद करण्यासाठी गदारोळ घालत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणीस यांनी केला.