मुंबई -देशाला हादरवून सोडणाऱ्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. सध्या या प्रकरणावरून राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात सातत्याने खटके उडत असून या प्रकरणाची आग अजूनही धगधगतच आहे.
आज राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे अध्यात्म समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केले. गेल्या एक वर्षापासून या साधूंना न्याय मिळाला नसल्यामुळे हे ठिय्या आंदोलन यावेळेस प्रवीण दरेकर आणि आचार्य तुषार भोसले यांच्याकडून करण्यात आले.
आचार्य तुषार भोसलेंची शिवसेनेवर टीका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी देशभरात कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे एका जिल्ह्यातून किंवा राज्यातून अति तातडीचा प्रवास मिळेल त्या मार्गाने रात्री-अपरात्री प्रवास नागरिक करत होते. अशाच एका प्रकरणातून गडचिंचले साधू हत्याकांडासारखी दुर्घटना घडली. काही समाजकंटकांनी ग्रामीण भागात चोर येतात, दरोडेखोर येतात लहान मुलांना पळवून नेतात, किडन्या काढतात अशा एक ना अनेक अफवा पसरवल्या. त्यामुळे अंधार झाला कि, गावागावातून नागरिक रस्त्यावर यायचे आणि येईल त्याला पकडून मारझोड करायची. थोडीशी ओळख पटली तर सोडून द्यायचे. पोलीस सोडवायला गेले की पोलिसांवर हल्ला करायचे असा कायदा हातात घेण्याचे काम काही समाजकंटक करताना दिसत होते. यातूनच पालघर जिल्ह्यात दोन-चार घटना घडल्या. मात्र गडचिंचले येथे घडलेला प्रकार देशाला हादरवून सोडणारा होता. आज या साधू हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण होत असले तरी या प्रकरणातील जे मुख्य दोषी आहेत त्यांना अजूनपर्यंत शिक्षा झालेली नाही. या सगळ्या दोषींच्या पाठीमागे राज्य सरकार ठाम उभे आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप अध्यात्म आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केलेला आहे. राज्य सरकार या प्रकरणाचा संपूर्ण तपास होऊ देत नाही. या तपासामध्ये राज्य सरकार आडकाठी आणत आहे आणि जे दोषी लोक आहेत त्यांना वाचवण्याचे काम या सरकारकडून होत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. प्रवीण दरेकर आणि आचार्य तुषार भोसले यांनी महात्मा गांधींचा पुतळा समोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान आचार्य तुषार भोसले यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. या वेळेस आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका करत भगव्या रंगाचे महत्त्व आता शिवसेनेला कळणे बंद झाले आहे. आणि याचे उत्तर जनता एक दिवस बरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देईल, अशी खरमरीत टीका यावेळेस आश्चर्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.