मुंबई- नुकतेच बेस्ट प्रशासनाने बसच्या तिकीट दरात कपात करून मुंबईकरांना दिलासा दिला आहे. आता पालिकेच्या सूचनेवरुन बेस्टच्या आगारातील पार्किंगचे दर कमी करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा अवजड वाहनचालकांसह, दुचाकी चारचाकी वाहनचालकांना फायदा होणार आहे. आज झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
दिवसेंदिवस मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बेस्टची जागा इतर वाहनांच्या पार्किंगसाठी वापरण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या जागेचा पार्किंगसाठी सदुपयोग झाल्यास बेस्टलाही आर्थिक सहाय्य होणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेच्या मुंबई पार्किंग ऑथोरिटीच्या माध्यमातून विविध भागात जास्तीत जास्त पार्किंगच्या जागा उपलब्ध करण्यात येत आहेत.