महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शरद पवार यांची तपश्चर्या आणि साधना देशाला पुढे घेऊन जाणारी - जयंत पाटील - jayant patil

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित '८ दशके कृतज्ञतेची' या विशेष कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

जयंत पाटील
जयंत पाटील

By

Published : Dec 13, 2020, 2:13 AM IST

मुंबई -शरद पवार यांची आठ दशके म्हणजे ही त्यांची तपश्चर्या आहे, त्यांची साधना आहे. हीच तपश्चर्या आणि त्यांची साधना देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जाणारी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित '८ दशके कृतज्ञतेची' या विशेष कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कोविड काळात आपण अनेक जिव्हाळ्याची नाती गमावली. त्यामुळे आदरणीय खासदार शरद पवार यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा विचार केला. मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यातील गोरगरीब सामान्य कार्यकर्ते तसेच अनेक विभागातील प्रतिष्ठित माणसं यांच्यासाठी वाढदिवस साजरा करावा, असा आग्रह आम्ही ठेवला. शरद पवार यांनी याला होकार दिला आणि हा कार्यक्रम पार पडत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही शेतकऱ्यांसोबत होता आणि यापुढेही असेल-

आज देशाच्या राजधानीच्या दारात शेतकरी बसला आहे. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन होत करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालही शेतकऱ्यांसोबत होता आणि यापुढेही असेल अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आदरणीय शरद पवार यांनी ८० वर्षाचा कालखंड अविरत लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम केले. पुढील ५०-१०० वर्षांनी देखील भारतातील सर्व घटकांना मदत करणारा नेता म्हणून पवारसाहेबांचे नाव घेतले जाईल, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

झालेले वार अडवण्याचे काम पवारसाहेबांनी केले-

महाराष्ट्र कुणामुळे घडला यात अनेक दिग्गजांची नाव घेता येतील त्यात प्रमुख नाव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. पण महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्तींच्या यादीत महाराष्ट्राला आकार देणारे म्हणून शरद पवार यांचे नाव घेतले तर चुकीचे ठरणार नाही. २०१९ ला झालेला चमत्कार आपण पाहिला. झालेले वार अडवण्याचे काम पवारसाहेबांनी केले. काही लोक म्हणाले की, पवारसाहेबांचा राजकीय कालखंड समाप्त झाला. परंतु त्यांनी बॉडीगार्ड आणि सरकारी लवाजमा सोडून महाराष्ट्रात फिरले तर त्यांना समजेल की कोणाचा कालखंड सुरू आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

महाराष्ट्राचे पाण्यासाठीचे हे चित्र पुढील काळात नक्कीच बदललेले-

मागच्या निवडणुकीत अनेकांनी पक्ष सोडला. मी सगळ्यांना सांगत होतो आमच्याकडे अ गेला तर ब आहे आणि ब गेला तर क आहे आणि इतकंच नाही तर आमच्याकडे शरद पवार नावाचं विद्यापीठ आहे, हे पूर्णतः खरे ठरले आहे. मी जलसंपदा खात्याची जबाबदारी घेताच शरद पवार यांनी फोन करून नाशिक आणि मराठवाड्यात पाणी देण्याचे काम कसं होईल याची माहिती दे, असा आदेश दिला. या कामाला आम्ही लागलोच आणि आता मी विश्वासाने सांगू शकतो की पुढील ३ वर्षात समुद्रात वाया जाणारे, हे पाणी मराठवाडा भागात फिरवण्याचे काम पूर्ण होईल. त्यासोबतच वैनगंगेच्या खोऱ्यातील पाणी नळगंगेला देण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी हा 'पण' करतो की महाराष्ट्राचे पाण्यासाठीचे हे चित्र पुढील काळात नक्कीच बदललेले दिसेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

व्हर्च्युअल रॅलीमध्ये दीड लाखापेक्षा जास्त लोकांचा सहभाग-

शरद पवार यांच्याकडे पाहिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना पूर्ण झाली. हा विश्वास मिळतो असेही जयंत पाटील म्हणाले. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्च्युअल रॅलीमध्ये दीड लाखापेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

२९ लाख दिव्यांगाना 'महाशरद' डिजिटल फ्लॅटफॉर्मचा फायदा-

त्यानंतर 'व्हर्च्युअल रॅली'च्या माध्यमातून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बीडहून सहभागी झाले होते. त्यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. माणूस सुध्दा देवमाणूस होवू शकतो, हे साहेबांनी घडवून दाखवलं आहे, अशा शब्दात शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी २९ लाख दिव्यांगाना 'महाशरद' डिजिटल फ्लॅटफॉर्मचा फायदा होणार असून या फ्लॅटफॉर्मचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नव्या वेबसाईटचेही (www.ncp.org.in) विमोचन शरद पवार यांच्या हस्ते झाले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहमंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, एकनाथ खडसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्हर्च्युअल माध्यमातून सहभाग घेत शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

'महास्वयंम' पोर्टलवर ८० हजारापेक्षा जास्त नोकर्‍यांची नोंदणी-

राज्यातील एक लाख आदिवासी बांधवांना मेडिकल किट्सचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना शरद पवार यांच्या हस्ते देऊन करण्यात आले. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतील जनतेच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 'महास्वयंम' पोर्टलवर ८० हजारापेक्षा जास्त नोकर्‍यांची नोंदणी झाली आहे. हा मेळावा २० डिसेंबरपर्यंत सुरू ठेवणार असल्याची घोषणाही नवाब मलिक यांनी केली.

१ मे रोजी एक लाख रोजगार शरद पवार यांच्या हस्ते उपलब्ध करुन देणार-

आयटीआयचा कायापालट करणारी ३० हजार कोटी रुपयांची योजना शरद पवार यांनी दिली आहे. १ मे रोजी एक लाख रोजगार शरद पवार यांच्या हस्ते उपलब्ध करुन देणार आणि गिनिज बुकामध्ये नोंद करणार असल्याचे नवाब मलिक यांनी जाहीर केले. यावेळी महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, खासदार फौजिया खान, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी आमदार हेमंत टकले, आदी उपस्थित होते.

हेही वाचा-शेतकरी आंदोलन आणखी तीव्र, १४ डिसेंबराला सर्व शेतकरी नेते बसणार उपोषणाला

हेही वाचा-नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर बंगालच्या तीन अधिकाऱ्यांना केंद्राचे बोलावणे

ABOUT THE AUTHOR

...view details