मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनामधून मुक्त झालेल्या रुग्णांना निमोनिया, श्वसनाचे विकार, हात पायांचे सांधे दुखणे व तणाव आदी आजारांनी ग्रासले आहे. पालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात कोरोनावर मात केलेले मात्र, त्यानंतर इतर आजारांनी ग्रासलेले 386 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. कोरोनानंतर इतर आजार होणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. मुंबईमध्ये आतापार्यंत २ लाख ८७ हजार ३१३ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २ लाख ६७ हजार ७०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, ११ हजार ८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५६ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी होत असून, रुग्णही कोरोना मुक्त होत आहेत. मात्र त्यानंतर इतर आजार होत असल्याने अशा रुग्णांसाठी पोस्ट ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
केईएम व नायर रुग्णालयात पोस्ट ओपीडी
महापालिकेच्या केईएम व नायर रुग्णालयातील पोस्ट ओपीडीत १२ डिसेंबरपर्यंत तपासणीसाठी आलेल्या कोरोनामुक्त ३८६ रुग्णांना निमोनिया, श्वसन विकार, हात व पायांचे सांधे दुखणे, तणाव हे आजार झाल्याचे समोर आले आहे. ३८६ रुग्णांपैकी २२४ पुरुष तर १६२ महिलांचा यामध्ये समावेश आहे. कोरोना विषाणूची लागण होण्यात पुरुषांची संख्या अधिक होती. त्याचप्रमाणे कोरोनानंतरच्या आजारातही पुरुषांची संख्या अधिक आहे. २२४ पुरुष तर १६२ महिलांना कोरोनानंतर इतर आजार झाल्याचे समोर आले आहे.
कोरोनामुक्त झाल्यावर इतर आजार
मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असला तरी कोरोनामुळे इतर आजार होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. १ डिसेंबरपर्यंत नायर व केईएम रुग्णालयातील पोस्ट ओपीडीत कोरोनाची लागण होऊन, त्यातून बरे झाल्यावर पुन्हा त्रास होत असल्याने ३३५ रुग्ण उपचारासाठी आले होते. यामध्ये १९७ पुरुष तर १३८ महिलांचा समावेश होता. या कोरोनामुक्त रुग्णांना निमोनिया झाल्याचे समोर आले आहे. तर काही कोरोनामुक्त रुग्णांना थेरेपीची गरज भासली. नायर व केईएम रुग्णालयातील पोस्ट ओपीडीत आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये ८० टक्के नवीन केसेस तर २० टक्के जुन्या केसेस होत्या. तर १ डिसेंबरनंतर पोस्ट ओपीडीत येणाऱ्या कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १२ डिसेंबरपर्यंत पोस्ट ओपीडीत ३८६ कोरोनामुक्त रुग्ण विविध आजारांनी त्रस्त असल्याने उपचारासाठी आले आहेत. अशी माहिती पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
गोरेगाव नेस्कोत १४० कोरोनावर मात केलेल्यांची तपासणी
गोरेगाव येथील नेस्को जंम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्ण संख्या कमी झाल्याने, त्याठिकाणी ३० नोव्हेंबरपासून पोस्ट ओपीडी सुरू करण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपासून ते आतापर्यंत १४० कोरोनामुक्त रुग्ण त्रास होत असल्याने पुन्हा तपासणीसाठी आले आहेत. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये प्रमुख्याने अशक्तपणा, निमोनिया, श्वसनाचे विकार, सांधे दुखी असे विविध आजार आढळून आले आहेत. दरम्यान, नेस्को जंम्बो कोविड सेंटर मधील पोस्ट ओपीडीत रक्त तपासणी, छातीचा एक्सरे, आरटीपीसीआर, समुपदेशन, तापावर औषध या सर्व सुविधा रुग्णांना मोफत देण्यात येत असल्याचे पोस्ट ओपीडीच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.