मुंबई -मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांच्या कपातीची घोषणा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केली होती. त्यानंतर गुरुवारपासून सुधारित तिकीट दर लागू झाले आहेत. पहिल्याच दिवशी एसी लोकलमधून मध्य रेल्वे मार्गावर ३७ हजार ७८६ तर पश्चिम रेल्वे मार्गावर ३७ हजार ९७२ असे एकूण ७५ हजार ७५८ प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला आहे.
Mumbai Local Train : तिकीट कपातीनंतर एसी लोकलचे प्रवासी सुसाट; 'इतक्या' प्रवाशांनी केला प्रवास - पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल
एसी लोकलच्या तिकीट दरात गुरुवारपासून ५० टक्के कपात झाल्याने प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. एरवी रिकामी धावणारी वातानुकूलित लोकल प्रवाशांनी भरुन जात असल्याने रेल्वेच्या गारेगार, स्वस्त, वेगवान आणि आरामदायी प्रवासाला प्रवाशांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
अशी वाढली प्रवासी संख्या -उन्हाने हैराण झालेले मुंबईकर एसी लोकलने प्रवास करत आहेत. एसी लोकलच्या तिकीट दरात गुरुवारपासून ५० टक्के कपात झाल्याने प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. एरवी रिकामी धावणारी वातानुकूलित लोकल प्रवाशांनी भरून जात असल्याने रेल्वेच्या गारेगार, स्वस्त, वेगवान आणि आरामदायी प्रवासाला प्रवाशांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे. बुधवारी दिवसभरात मध्य रेल्वेचे ३१०० प्रवासी होते तर गुरुवारी आकडा ३७ हजार ७८६ वर पोहोचला होता. तर पश्चिम रेल्वेची गुरुवारी प्रवासी संख्या ३७ हजार ९७२ होती. यातून मध्य रेल्वेला १५ लाख ८६ हजार ५२० रुपयांचे तर पश्चिम रेल्वेला १५ लाख ३६ हजार २५५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. उपलब्ध आकड्यांनुसार तिकीट दर कमी झाल्याने वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी प्रवाशांची संख्या वाढल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुधारित तिकीट दर लागू -पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलचे तिकीट दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नव्हते. त्यामुळे एसी लोकलकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. या एसी लोकलचे तिकीट काढणे प्रवाशांना परवडत नव्हते. त्यामुळे एसी लोकलचे तिकीट दर कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. याची दाखल घेऊन उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर गुरुवारपासून सुधारित तिकीट दर लागू झाले आहेत.