मुंबई - अनलॉकमध्ये लोकलअभावी प्रवाशांचे हाल सुरू आहेत. सहा महिन्यांपासून कमाईचे साधन पूर्ण ठप्प असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. लोकल सुरू नसल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत असून, लोकलसेवा तातडीने सुरू कण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र दुसरीकडे नियम व अटींवरून रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यात मतभेद असल्यामुळे, लोकल सुरू करण्यास विलंब होताना दिसत आहे. रेल्वे लवकरात लवकर सुरू करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा आता प्रवासी संघटनांकडून देण्यात आला आहे.
लोकल अभावी प्रवाशांचे हाल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या लॉकडाऊनमध्ये मुंबईची लाइफलाइन असलेली लोकलही बंद करण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र या लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा आहे. सामान्य प्रवाशांना लोकलमधून प्रवास करता येत नसल्याने त्यांना खासगी वाहतुकीवर अवलंबून रहावे लागत आहे. यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.
राज्य सरकार व रेल्वे प्रशासनामध्ये मतभेद
राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे सुरु करा यासाठी विनंती केलेली आहे. राज्य सरकारच्या विनंती नंतर आम्ही लोकल सुरू करण्यासाठी सज्ज आहोत असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र दुसरीकडे नियम व अटींवरून रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यात मतभेद असल्यामुळे, लोकल सुरू करण्यास विलंब होताना दिसत आहे. दोन्हीकडून देखील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे.
रेल्वे प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात