मुंबई -ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळायलाच पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका राहिली आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढून ओबीसीचे राजकीय आरक्षण लागू करावे. त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी भूमिका काँग्रेस पक्षाची असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसची ओबीसी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली. इम्पेरिकल डेटा आल्यानंतर ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत, अशीच भूमिका काँग्रेसची आल्याचे पटोले यांनी सांगितले. तसेच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत काँग्रेसकडून आपली भूमिका मांडली जाईल, असे नाना पटोले यांनी सांगितले.
ओबीसीच्या आरक्षण मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष हे पुतना-मावशीचे प्रेम दाखवत असल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. तसेच राज्य सरकारने तयार केलेल्या मागासवर्गीय आयोगाकडून काम सुरू करण्यात आले आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत मागासवर्गीय आयोगाकडून इम्पेरिकल डेटा सादर केला जाईल. मात्र त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यास ओबीसी आरक्षण लागू करूनच त्या निवडणुका घेण्यात याव्यात असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
हे ही वाचा -भिवंडीत इमारत कोसळली; एकाचा मृत्यू तर 9 जखमी