मुंबई - समाजामध्ये असे मोजकेच दानशूर लोक आहेत, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर अभिमान वाटतो. संपत्ती-दागिने यांचा मोह अनेकांना असतो, मात्र आपल्या जवळचे सर्व दागिने विकून गरजू रुग्णांना ऑक्सिजनचे सिलिंडर पुरवण्याचे काम मालाड परिसरातील सलधाना कुटुंबाने केले आहे.
पस्कोल सलधाना कुटुंब मुंबईच्या मालाड परिसरातील मालवणी या कुटुंबात चौघेजण राहतात. सलधाना यांच्या पत्नी रोझी या किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना डायलिसिस करावा लागतो. कोरोनाच्या काळात रुग्णांची होणारी वाताहत पाहता व्याकूळ झालेल्या सलधाना यांच्या पत्नीने पस्कोल यांना सांगितले की, आपल्या घरातील दागिने विका, दागिने घरात राहून डबल होणार नाहीत. बाहेर अनेक जण ऑक्सिजन सिलिंडरच्या शोधात आहेत. त्यांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. ऑक्सिजन अभावी अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. घरातले दागिने विकून त्यातून येणाऱ्या पैशातून गरजूंना मदत करा. अशा सूचना पत्नीने दिल्यानंतर पस्कोल यांनी घरातले दागिने विकले आणि अनेक गरजू रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडर मोफत दिले.