मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माध्यमांनी विचारल्यानंतर त्यांनी, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असे म्हटले होते. तसेच तो इमॅच्युअर आहे, असे पवार म्हणाले. यावरून पुन्हा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष समोर आला होता. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर लगेचच पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असे सूचक ट्वीट केले आहे.
पार्थ यांनी स्वत:च्या महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेऊन पक्षाला घरचा आहेर दिला होता. यानंतर शरद पवार यांनी पार्थला धारेवर धरले. त्यांचा इमॅच्युअर असा उल्लेख करून पवारांनी या प्रकरणावर पडदा टाकला. यानंतर पवार कुटुंबीयांतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आले.