मुंबई -मराठा आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ट्विट केल्याने चर्चेला उधाण आले आहे. विवेकची आत्महत्या सर्वांचा विचार करायला लावणारी आहे. एका पिढीचे भवितव्य पणाला लागले आहे. हे सगळं पाहता सर्वोच्च न्यायालयात जाण्याखेरीज माझ्यासमोर पर्याय नाही. असे ट्वीट पार्थ यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी पार्थ यांनी राम मंदिरा बाबत ट्वीट करत शरद पवारांची नाराजी ओढवून घेतली होती.
मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर समाजात अस्वस्थता वाढली आहे. विविध ठिकाणी यासाठी बैठका पार पडत असून मराठा समाजाचे नेते देखील आक्रमक झाले आहेत. यातच बीडमधील एका तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना समोर येताच वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आत्महत्येपूर्वी या तरुणाने चिठ्ठी लिहून ठेवली होती. आता पार्थ पवार यांनीही संबंधित मुलाच्या मृत्यूचा दाखला देत मराठा आरक्षणासंदर्भात ट्विट केले आहे.